Deputy CM Eknath Shinde News: कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे व्हिजन असलेले खासदार आहेत. ज्यावेळी एखाद्या मतदारसंघाला व्हिजन असलेला लोकप्रतिनिधी लाभतो त्यावेळी मतदारसंघाचा निश्चितच कायापालट होतो. याचे उदाहरण कल्याण लोकसभा मतदारसंघात दिसून येते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोणतेही काम एकदा हातात घेतले तर ते तडीस नेई पर्यंत त्याचा पाठपुरावा करत असतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी डोंबिवली येथील वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाच्या कामाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन पार पडले. सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलाच्या टप्पा - १ ची उभारणी करण्यात येणार आहे. तर १५ कोटी रुपयांच्या निधीतून सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी करण्यात येणार आहे. डोंबिवली येथे उभारण्यात येणारे वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलमुळे जिल्ह्यातील खेळाडूंना एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
अनेक कल्याणकारी योजना राबवल्या
महायुती सरकारच्या कार्यकाळात राज्यातील प्रत्येक शहरासाठी भरीव निधी देण्याचे काम केले. तसेच शासन आपल्या दारी या योजनेच्या माध्यमातून नागरिकांच्या घरपोच अनेक शासकीय सुविधांचा लाभ मिळवून दिला. महिला सक्षमीकरणासाठी, युवकांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याच पद्धतीने कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी आजवर कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे मतदार संघाचा अधिक गतीने विकास होत आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेली लाडकी बहीण योजना ही कायम सुरूच राहील, कोणीही बंद करू शकत नाही, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कमी काळातही कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी निश्चितच भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, असेही यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
विकासाचेच राजकारण चालणार: खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे
कल्याण डोंबिवली शहर गेल्या दहा वर्षात बदलले. २०१४ नंतर या शहरासाठी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत याची सुरुवात केली. कधीही राजकारणाला प्राधान्य दिले नाही तर पहिल्या दिवसांपासून फक्त आणि फक्त विकासकामे कशी होतील याच्यावर भर दिला. मेट्रोचे जाळ आपल्या मतदारसंघात दिसणार आहे. मेट्रो, उड्डाणपूल, शिळफाटा रस्त्याचे सहापदरीकरण, रेल्वेच्या अतिरिक्त मार्गिका यांसारखे अनेक मोठे प्रकल्प आज मतदारसंघात उभे राहत आहे. यामुळे कल्याण डोंबिवली शहर बदलत आहेत, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, कल्याण डोंबिवलीसाठी मोठा दिवस आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील कोट्यवधीची विकासकामे पार पडतायत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासूनच या कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासनिधी यायला सुरुवात झाली. २०१४ पूर्वी येथील खासदार फक्त बीएसएनएल आणि रेल्वेपूरताच मर्यादित होते. २०१४ नंतर मात्र लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सर्वच लोकप्रतिनिधींनी सर्वच प्रश्नांना बांधील राहिले पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. यालाच अनुसरून आम्ही काम करत आहोत. कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते. कुठलेही काम आपण केलंच पाहिजे. त्यासाठीच लोकांनी निवडून दिलेले असते. डोंबिवलीतील वै.ह.भ.प.संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंना एक सर्व सोयी सुविधांनी युक्त असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. यामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळणार आहे आणि या संकुलातून निश्चितच अनेक महान खेळाडू घडतील, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
Web Summary : Deputy CM Eknath Shinde lauded his son, MP Shrikant Shinde, as a visionary leader. Development projects worth crores were inaugurated in Kalyan-Dombivli. Shinde affirmed commitment to continued progress and welfare schemes.
Web Summary : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने बेटे सांसद श्रीकांत शिंदे को दूरदर्शी नेता बताया। कल्याण-डोंबिवली में करोड़ों की विकास परियोजनाओं का उद्घाटन हुआ। शिंदे ने निरंतर प्रगति और कल्याणकारी योजनाओं के प्रति प्रतिबद्धता जताई।