उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:43 IST2025-11-07T14:40:20+5:302025-11-07T14:43:13+5:30
Deputy CM Eknath Shinde Meet Anna Hazare: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी घेतलेली अण्णा हजारेंची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचे म्हटले जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
Deputy CM Eknath Shinde Meet Anna Hazare: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. युती, आघाडी यावरून मतमतांतरे समोर येत आहेत. दररोज नवनवे आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे दिसत आहेत. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या भेटीचे नेमके कारण काय, याबाबत राजकीय वर्तुळाच चर्चांना सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मभूषण अण्णा हजारे यांची त्यांच्या राळेगणसिद्धी या मूळ गावी जाऊन सदिच्छा भेट घेतली. अण्णांनी राळेगणसिद्धी येथे केलेले जलसंधारणाचे उत्कृष्ट काम संपूर्ण देशवासीयांसाठी दिशादर्शक आहे. याच ठिकाणी आता बांबू लागवड अभियान हाती घेण्यात येणार असून या कामाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले
अण्णा हजारे यांच्या भेटीबाबत सांगताना एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून इतर अनुषंगिक कामे पूर्ण करण्यासंदर्भात मागणी करणारे निवेदन दिले. यासंदर्भात आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना फोन करून सदर काम स्वतः लक्ष घालून पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, गावातील दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शंभूराज मापारी याला डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने २५ हजारांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच राळेगणसिद्धी येथे येणाऱ्या पर्यटकांना पद्मभूषण अण्णा हजारे यांचा जीवनपट 'किसन हजारे ते अण्णा हजारे' दाखवण्यासाठी केंद्र उभारण्याची मागणी केली ही मागणीही तात्काळ पूर्ण करण्यासाठी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांना सांगितले.