“जे येतील त्यांचे स्वागत आहे”; राजन साळवींच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 17:02 IST2025-02-12T17:02:30+5:302025-02-12T17:02:58+5:30
Deputy CM Eknath Shinde: मातोश्रीचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले राजन साळवी ठाकरे गटातील पदाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे.

“जे येतील त्यांचे स्वागत आहे”; राजन साळवींच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
Deputy CM Eknath Shinde: गेल्या काही महिन्यांपासून माजी आमदार राजन साळवी यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजन साळवी लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. ही राजकीय घडामोड ठाकरेंना कोकणात धक्का देणारी आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिला.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातून ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक यांच्यासह अनेक जण शिवसेना शिंदे गटात सामील होत आहेत. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. एकीकडे स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली असली, तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत चालल्याचे दिसत आहे. असेच सुरू राहिल्यास आगामी महापालिका निवडणुका या ठाकरे गटासाठी मोठे आव्हान ठरू शकते, असे सांगितले जात आहे. राजन साळवी यांनी राजीनामा दिल्यानंतर याबाबत एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. ते पत्रकारांशी बोलत होते.
जे येतील त्यांचे स्वागत आहे
राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. राजन साळवी तुमच्याकडे येणार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, जे लोक येतील, त्यांचे स्वागत आहे. कारण गेल्या अडीच वर्षांत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांच्या शिवसेनेत आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल झाले. या सर्वांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आम्ही स्थापन केले. अडीच वर्षांत जे काम केले, ते लोकांना माहिती आहे. म्हणून लोक आमच्या कामावर विश्वास दाखवत आहेत. हे काम करणारे सरकार आहे, घरी बसणारे नाही. हे रिझल्ट देणारे सरकार आहे. प्रत्यक्ष मैदानात उतरून २४ तास ७ दिवस काम करणारे सरकार आहे. मी मुख्यमंत्री असताना, एवढे निर्णय केले, एवढे प्रकल्प मार्गी लावले, लोकाभिमुख कल्याणारी योजना आणल्या. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले. विकासाचा अजेंडा पुढे घेऊन सरकार आणि शिवसेना जात आहे. यामुळेच अनेक जण शिवसेनेत येत आहेत. त्या सर्वांचे स्वागत करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासूनच राजन साळवी यांच्या पक्षांतराच्या चर्चांना तोंड फुटले होते. पण, त्या त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. शिवसेना फुटीनंतरही साळवी ठाकरेंसोबत राहिल्याने त्यांना मातोश्रीचे निष्ठावंत समजले जात होते. पंरतु पक्षातीलच स्थानिक नेत्यासोबत खटके उडाल्याने ते नाराज होते. राजन साळवी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, राजन साळवी हे गुरूवारी म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश करणार आहेत. परंतु, राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत सामंत बंधू नाराज असल्याची चर्चाही आहे. त्यावर आता एकनाथ शिंदे कसा मार्ग काढतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.