CM Devendra Fadnavis And DCM Ajit Pawar: गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विविध राजकीय मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भातील एका जाहिरातीचा विषय चांगलाच गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांनी या जाहिरातीवरून बरीच टीकाही केली. परंतु, या जाहिरात प्रकरणाचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीतही उमटल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत असल्याची आणि त्यावर फक्त देवाभाऊ असा उल्लेख असलेली जाहिरात प्रसारमाध्यमामध्ये तसेच राज्यभरातील जाहिरात फलकांवर प्रसिद्ध झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत ही जाहिरात चर्चेला विषय ठरली आहे. सदर जाहिरात कोणी दिली, याचा शोध विरोधकांकडून घेतला जात आहे. देवाभाऊंच्या जाहिरातीचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत आल्याचे म्हटले जात आहे. प्रसिद्धी कशी करावी तर देवाभाऊंसारखी, असे म्हणत काही ज्येष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे कौतुक केल्याचे म्हटले जात आहे.
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख
मुंबईला मनोरंजन व पर्यटन क्षेत्राची राजधानी बनविण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकताना उद्योग विभागाने तयार केलेल्या ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) धोरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. उद्योग विभागाकडून मंत्रिमंडळासमोर या धोरणाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर त्यातील कल्पना आणि तरतुदी आणि योजनांचे मंत्रिमंडळाने तोंडभरुन कौतुक केले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे कौतुक करताना, या चांगल्या धोरणाची प्रसिद्धीही चांगली करा. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहीरात करा असे सांगितले. जाहिरात कशी हवी, देवाभाऊसारखी असे पवार म्हणताच उपस्थित सभागृहात हशा पिकला.
दरम्यान, यानंतर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ प्रतिक्रिया देत, होय... अशीच जाहिरात व्हायला हवी. कोणी काही म्हणो प्रसिद्धी अशीच व्हायला हवी असे सांगत विषयावर पडदा टाकल्याचे सांगितले जात आहे.