सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळलीये, असा आरोप करणाऱ्या विरोधकांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शिर्डीतील अधिवेशनात ते बोलत होते. बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला अन् या प्रकरणातील तपासातून समोर आलेल्या गोष्टींतून खरं काय ते समोर आले आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांवर पलटवार केला आहे. एवढेच नाही तर नवा मुद्दा आला की, ते 'फेक नरेटिव्ह' सेट करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही यावेळी अजित पवारांनी विरोधकांवर केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली का?
शिर्डीतील अधिवेशनातील आपल्या भाषणात अजित पवार म्हणाले की, एखादी बातमी येते अन् त्याची शहानिशा न करता विरोधक त्यावर ठोकून बोलायला लागतात. सिनेस्टर सैफ अली खानच्या घरात एक चोरटा शिरला. त्याच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर काहींनी थेट मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली, अशी वक्तव्ये केली. आता एका घरात एक चोरटा शिरला की, लगेच कायदा सुव्यवस्था ढासळली का? असा प्रश्न उपस्थितीत करत त्यांनी विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केला. जे घडलं ते होता कामा नयेच, मी त्या चोरट्याचं समर्थन करत नाही, असेही ते म्हणाले.
त्याला माहिती पण नव्हतं ते नटाचं घर आहे की नटीचं! ते पुढे म्हणाले की, या घटनेनंतर पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि तो ठाण्यामध्ये सापडला. त्यानं सगळं कबुल केलं. आठ महिन्यापूर्वी तो बांगलादेश सोडून कोलकाता येथे आला. मुंबईसंदर्भात बरंच ऐकलं होतं म्हणून जीवाची मुंबई करायला इकडं मुंबईत आला. हाउस किंपिंगच काम केलं. ज्या एजन्सीकडे तो काम करत होता त्यांनी त्याचे आधार कार्ड वैगेरे आवश्यक कादपत्रे पाहून शहानिशा न करता त्याला काम दिले. याप्रकरणात त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात आलीये. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व धागेदोरे शोधून काढले आहेत. त्याला माहिती पण नव्हतं ते नटाचं घर आहे की नटीचं! कुणीतरी त्याला सांगितल होतं की इथं सर्व श्रीमंत लोक राहतात. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने तो तिथं गेला होता, हा सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम त्यांनी सांगितला.
'फेक नेरेटिव्ह सेट' करण्याचा प्रयत्न; अजित पवारांचा विरोधकांवर आरोप
हे सांगायचं तात्पर्य एवढंच की, तुमच्या माझ्या महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी महायुतीच सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करते आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून विरोधकांकडे कोणता मुद्दाच राहिला नाही नवीन मुद्दा कुठला आला की, लगेच फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु होतो, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.