'मविआ बेईमानीचे सरकार, जनतेचा कौल डावलून...', देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 20:18 IST2022-08-16T20:01:14+5:302022-08-16T20:18:03+5:30
'महाविकास आघाडी सरकारमध्ये एकी नव्हती, त्यामुळे त्यांच्या काळात जनतेच्या हिताचे निर्णय प्रलंबित राहिले.'

'मविआ बेईमानीचे सरकार, जनतेचा कौल डावलून...', देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबई: उद्या म्हणजेच 17 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीसांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
'मविआ बेईमानीचे सरकार'
पत्रकार परिषदेत मविआ सरकारवर टीका करताना फडणवीसांनी दोन्ही सरकारमधील फरक स्पष्ट करुन सांगितला. ते म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकारमध्ये एकी नव्हती, त्यामुळे त्यांच्या काळात जनतेच्या हिताचे निर्णय प्रलंबित राहिले. फक्त शेतकऱ्यांच्याच बाबतीत नाही, तर सर्वच क्षेत्रासाठी मविआ बेईमानीचे आणि नुकसानीचे सरकार होते. जनतेचा कौल डालवून ते सरकार स्थापन झालं होतं. पण, आता विधानसभा निवडणुकीत ज्यांनी एकत्रित येऊन मते मागितली होती, ते दोन पक्ष आज सत्तेत आले आहेत,' असं फडणवीस म्हणाले.
'विरोधकांमध्ये एकी नाही'
ते पुढे म्हणतात की, 'विरोधकांमध्ये एकी नाही, त्यांनी आमची चिंता करण्यापेक्षा त्यांच्यातल्या एकीची चिंता करावी. तीन पक्षाच्या तीन वेगळ्या दिशा पाहायला मिळतात. विधान परिषदेत विरोधी पक्ष नेत्याची निवड आम्हाला न विचारता केली असं काँग्रेस नेते बोलले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली होती. सत्तेत असतानाही तीन पक्षामध्ये एकी नव्हती आता विरोधी पक्षात गरज असतानाही एकी दिसत नाही,' असा घणाघातही फडणवीसांनी केला.