डेंग्यूवरील उपाययोजना कागदोपत्रीच
By Admin | Updated: October 15, 2014 01:40 IST2014-10-15T01:40:26+5:302014-10-15T01:40:26+5:30
शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाययोजना करण्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे केला जात आहे. परंतु उपाययोजना कागदोपत्रीच असल्याचे चित्र आहे.

डेंग्यूवरील उपाययोजना कागदोपत्रीच
महापालिका : तपासणी करणारी यंत्रणाच नाही
नागपूर : शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत. यावर उपाययोजना करण्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे केला जात आहे. परंतु उपाययोजना कागदोपत्रीच असल्याचे चित्र आहे.
डेंग्यूचा रुग्ण आढळल्यास त्या भागात सर्वे करून नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. परंतु डेंग्यूची तपासणी न करता मलेरियाची केली जाते. त्यामुळे आजार एक व उपचार दुसरा असा प्रकार सुरू आहे. असे असतानाही डेंग्यूचे डास आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा मनपाच्या मलेरिया व फायलेरिया विभागाने दिला आहे.
डेंग्यूचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास झोन कार्यालयाच्या माध्यमातून आरोग्य विभागातील कर्मचारी रुग्णाच्या घरी भेट देतात. घराची व परिसराची पाहणी करतात. घर वा परिसरात डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. गरज भासल्यास जंतुनाशकाची फवारणी करतात. या परिसरातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी घेतले जातात. डेंग्यूला आळा घालण्यासाठी हा प्रकार केला जात असावा, असा लोकांचा समज असतो. परंतु प्रत्यक्षात असे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागते. मागील काही महिन्यात शहरात डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
फॉगिंग केल्यानंतरही डासांची संख्या नियंत्रणात येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांपुढे समस्या उभी ठाकली आहे. (प्रतिनिधी)