भाईंदरमध्ये डेंग्यूचे ११ रुग्ण
By Admin | Updated: September 20, 2016 03:42 IST2016-09-20T03:42:25+5:302016-09-20T03:42:25+5:30
जानेवारीपासून १७ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूच्या ६१५ संशयित रुग्णांपैकी केवळ ४० जणांच्या रक्ताचे नमुने जिल्हा रुग्णालयात पाठवले होते

भाईंदरमध्ये डेंग्यूचे ११ रुग्ण
मीरा रोड : मीरा भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार जानेवारीपासून १७ सप्टेंबरपर्यंत डेंग्यूच्या ६१५ संशयित रुग्णांपैकी केवळ ४० जणांच्या रक्ताचे नमुने जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. त्यापैकी केवळ ११ जणांनाच डेंग्यूची लागण झाल्याचा अहवाल आहे. अन्य ६०४ रुग्णांना पालिका संशयित समजत आहे. तर मृत्यू झालेले तिघेही डेंग्यूचे संशयित असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.
पालिका क्षेत्रातील खाजगी रुग्णालय, दवाखाने येथून तसेच आरोग्य केंद्रात येणाऱ्या डेंग्यूच्या संशयित रुग्णांची माहिती गोळा करुन ती एकत्रित केली जाते. परंतु वैद्यकीय विभागाकडची आकडेवारी ही नाममात्र असून प्रत्यक्षात डेंग्यूचे संशयित रुग्ण बरेच असल्याचे सूत्र सांगतात. डेंग्यूच्या चाचणीसाठी खाजगी रक्त तपासणी केंद्र प्रत्येकी १००० ते १४०० रुपये वसूल करते. एनएस १ च्या चाचणीसाठी सुमारे १००० रुपये तर आयजीएम चाचणीसाठी सुमारे १४०० रुपये आकारले जातात. या चाचणीत डेंग्यू असल्याचा अहवाल आला की बहुतांश रुग्णांना सरळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करुन घेतले. प्रशासन मात्र डेंग्यूसाठीच्या या दोन्ही चाचण्या मानत नाही. (वार्ताहर)
>पालिकेचा दुटप्पी कारभार
धक्कादायक बाब म्हणजे ज्या चाचण्या पालिकाच मान्य करत करत नाही त्याच रॅपीड (एनऐस १, आयजीजी व आयजीएम कीट) पध्दतीच्या तपासण्या पालिकाच रुग्णालयातील रक्त तपासणी लॅब मध्ये करते. पालिकेच्या दुटप्पी कारभारामुळे नेमके डेंग्यूचे खरे रुग्ण किती हेच कळत नाही.