लोकशाहीच अमान्य आहे का?
By Admin | Updated: May 30, 2014 01:13 IST2014-05-30T01:13:48+5:302014-05-30T01:13:48+5:30
अ.भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात येणार्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येते. पण त्यामुळे महामंडळाला हवा तो अध्यक्ष निवडता येत नाही. साहित्य वाचकांना हवा तो

लोकशाहीच अमान्य आहे का?
अ.भा. मराठी साहित्य महामंडळ : ३१ मेच्या बैठकीत निवडणूक रद्द करण्याचा प्रस्ताव
राजेश पाणूरकर - नागपूर
अ.भा. मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात येणार्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात येते. पण त्यामुळे महामंडळाला हवा तो अध्यक्ष निवडता येत नाही. साहित्य वाचकांना हवा तो अध्यक्ष निवडीचे स्वातंत्र्य देण्यापेक्षा महामंडळ सदस्यांनाच अध्यक्ष निवडीचे संपूर्ण अधिकार देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. यासंदर्भात साहित्य महामंडळाची बैठक ३१ मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली असून, संमेलनाध्यक्षपदाची निवडणूकच रद्द करण्याचा प्रयत्न आहे.
याविरोधात तमाम मराठी वाचक, साहित्य रसिक आणि साहित्यिकांनी मत व्यक्त केले असून, महामंडळाला लोकशाहीच अमान्य आहे का? असा सवाल करण्यात आला आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष निवडीसाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात येते.
मतदानाचा अधिकार द्या
काही निवडक मतदारांनाच मतदानाचा अधिकार आहे. प्रत्येक घटकसंस्थेला केवळ १७५ सदस्यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यात विदर्भ साहित्य संघाचे सदस्य सात हजार आहेत. मुंबई, मराठवाडा साहित्य परिषदेची सदस्य संख्या एक हजार ते बाराशे आहे.
पण त्यांनाही १७५ मतांचाच अधिकार आहे. त्यामुळे सर्व घटक साहित्य संस्थाच्या एकूण २0 हजार मतदारांना संमेलनाध्यक्ष निवडीचा अधिकार असावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीचा परिणाम म्हणूनच गेल्या दोन वर्षांंंपूर्वी मतदारांची संख्या चौथ्यांदा वाढविण्यात आली. मतदार संख्या वाढविण्यात आली असली तरीही महाराष्ट्रातल्या १३ कोटी साहित्य रसिकांचे प्रतिनिधित्व ही संख्या करू शकत नाही. पण किमान लोकशाही पद्धतीने निवडणूक होत असल्याने रसिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. त्यात आता महामंडळ निवडणूक रद्द करून संमेलनाध्यक्ष थोपविणार असेल तर लोकशाहीच अमान्य करण्यासारखे आहे. महामंडळाचे निवडक सदस्य १३ कोटी मराठी जनतेचे प्रतिनिधित्व कसे करू शकतात? असा सवाल महाराष्ट्रातल्या तमाम साहित्यिकांनी केला आहे. काही साहित्यिक संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्याचा विरोध करतात. अशा काही साहित्यिकांना महामंडळ संमेलनाध्यक्ष करू इच्छिते. यंदा यात ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांना संमेलनाध्यक्ष करण्याची तयारी सुरू असल्याचे कळते. पण ना.धों. महानोर लोकशाही पद्धतीने विधान परिषदेत जाऊ इच्छितात तर संमेलनाध्यक्ष पदासाठी ते निवडणूक का नाकारत आहेत? असाही तिखट सवाल आता मराठी जनतेने केला आहे. साहित्य महामंडळाचे विश्व मराठी साहित्य संमेलन घटनादुरुस्तीच्या मुद्यावर अडचणीत सापडले असताना, घटनाबाह्य निवडणूकच रद्द करण्याचा विचारही करण्याचे धाडस महामंडळ कसे काय करू शकते? आतापर्यंंंत निवडणूक रद्द करून संमेलनाध्यक्षांची निवड करण्याबाबत अनेक वेळा विचार करण्यात आला. पण प्रत्येक बैठकीत निवडणुकांशिवाय पर्याय नाही, असाच निर्णय घेण्यात आलेला आहे. हे चित्र स्पष्ट असताना निवडणूक रद्द करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरते. यापेक्षा साहित्यावर प्रेम करणार्या सर्व घटक संस्थांच्या सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याची मागणी समोर येते आहे. ३१ मेच्या महामंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो, ते कळेलच.(प्रतिनिधी)