Delhi Election Results: सदा न् कदा आम्हीच राज्य करू हा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला; शिवसेनेचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 13:00 IST2020-02-11T12:51:59+5:302020-02-11T13:00:04+5:30
आपनं 70 पैकी 56 जागांवर आघाडी घेतलेली असून, केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत.

Delhi Election Results: सदा न् कदा आम्हीच राज्य करू हा अहंकार दिल्लीकरांनी उतरवला; शिवसेनेचा भाजपाला टोला
मुंबईः दिल्ली निवडणुकीत आपचा विजयी वारू भाजपाला रोखता आलेला नाही. आपनं 70 पैकी 56 जागांवर आघाडी घेतलेली असून, केजरीवाल पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याच्या तयारीत आहेत. परंतु आपलाही यंदा गेल्या वेळच्या तुलनेत अपेक्षित यश मिळालेलं नाही, तर भाजपाला 3 वरून 14 जागा मिळत असल्याचा कल समोर आला आहे. हाती आलेल्या कलानंतर शिवसेनेनंही आता प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पार्टीला दिल्लीतल्या लोकांनी नाकारलेलं आहे, असं म्हणत शिवसेना नेते अनिल परब यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
सदा न् कदा आम्हीच राज्य करू, आमच्याशिवाय कोणीच राज्य करू शकत नाही हा जो अहंकार असतो. तो लोक कधी ना कधी तरी उतरवतात. आपची सत्ता जी पाच वर्षं होती, ती दिल्लीतल्या लोकांनी मान्य केलेली आहे. भारतीय जनता पार्टीला लोकांनी नाकारलेलं आहे, असंही अनिल परब म्हणाले आहेत. तसेच मोदींच्या देशद्रोह्यांसंदर्भातील विधानाचा हवाला देत शिवसेनेनं त्यावर भाष्य केलं आहे. देशद्रोहाची व्याख्या काय हे सर्वात महत्त्वाचं असून, ते लोकांनी मान्यसुद्धा करायला पाहिजे. एका व्यक्तीनं देशद्रोहाची व्याख्या करणं म्हणजे ती देशद्रोहाची व्याख्या होत नाही. लोकांनादेखील ती मान्य असावी लागते. लोकांना काय मान्य आहे ते लोकांनी दाखवून दिलं आहे. महाराष्ट्रात जे सत्तापरिवर्तन झालेलं आहे, त्याचा परिणाम दिल्लीत दिसतो आहे.
देशाच्या राजकारणाला शिवसेनेनं वेगळं वळण दिलं आहे. त्या वळणाचे परिणाम हळूहळू दिसायला लागले आहेत. दिल्लीत आपची सत्ता उलथवण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर संपूर्ण देशातून भाजपाचे दिग्गज नेते उतरवले गेले होते. एवढे सगळे दिग्गज नेते उतरवल्यानंतरही दिल्लीसारख्या छोट्या प्रदेशावर ते आपला कब्जा करू शकलेले नाहीत. जिंकू शकलेले नाहीत. यातच सगळ्या पुढच्या भविष्याची दिशा दिसते आहे. दिल्लीकरांनी पूर्ण भाजपालाच नाकारलं आहे. आता भाजपाचे जे प्रमुख दिल्लीत बसतात, त्यांनाच नाकारलं असल्याचं आम्ही समजतो, असं म्हणत अनिल परब यांनी टीकास्त्र सोडलं आहे.