लॉटरी पद्धतीमुळे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

By Admin | Updated: July 20, 2016 02:15 IST2016-07-20T02:15:03+5:302016-07-20T02:15:03+5:30

मुंबईत राबविल्या जाणाऱ्या ‘दत्तक वस्ती योजने’त सहभागी संस्थांकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने येथील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला

Deletion of waste management due to the lottery system | लॉटरी पद्धतीमुळे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

लॉटरी पद्धतीमुळे कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत राबविल्या जाणाऱ्या ‘दत्तक वस्ती योजने’त सहभागी संस्थांकडे प्रशिक्षित मनुष्यबळ नसल्याने येथील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. मुंबई महापालिकेच्या ‘लॉटरी सिस्टम’मुळे ही समस्या निर्माण झाली असून, यावर तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.
नागरिकांच्या घरी जात कचरा गोळा करणे, त्याची विल्हेवाट लावणे हे दत्तक वस्ती योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. १९९७ साली हे काम बोरीवलीमधील काजुपाडा परिसरात असलेल्या ‘आदर्श नागरीक सेवा संस्थे’ मार्फत सुरु झाले. ज्या संस्थेला १९९७ मध्ये ‘बेस्ट वर्कर अ‍ॅवॉर्ड’ देत सन्मानित करण्यात आले होते. या अंतर्गत स्थानिकांना माफक किंमत आकारून कचरा गोळा करण्याचे काम केले जात होते.
या कामातून गोळा झालेल्या रक्कमेतुन कचरावेचकांना विम्याची सुविधा दिली जात होती, असे संस्थेचे प्रमुख अभय चौबे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. याच कामाकडे
पाहून महापालिकेने दत्तक वस्ती योजना सुरु केली, असा दावाही
चौबे यांनी केला.
मात्र यात कामगारांना काहीच सुविधा देण्यात आली नाही. शिवाय कमी मोबदल्यात चौपट काम करून घेण्याकडे कल वाढला. परिणामी कामाचा दर्जा घसरला, असेही त्यांनी सांगितले.
>तीन वेळा निघाल्या जाहिराती
पहिली जाहिरात : दत्तक वस्ती योजनेत संस्थेची निवड करण्यासाठी संबंधित संस्था नोंदणीकृत असणे, संस्थेकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आणि संस्था आर्थिकदृष्टया सक्षम असणे बंधनकारक होते.
दुसरी जाहिरात : दुसऱ्या वेळच्या जाहिरातीत बचत गटांकडून अर्ज मागवण्यात आले. आणि यावेळी सुरुवातीच्या अटी तशाच ठेवत संस्थेच्या नोंदणीकृतसंबंधीची अटल शिथिल करण्यात आली.
तिसरी जाहिरात : तिसऱ्यांदा पालिकेने ‘लॉटरी’ पद्धत सुरु केली. यात नोंदणी असलेल्या नसलेल्या, तसेच मनुष्यबळ किंवा आर्थिकदृष्टया सक्षम आणि अक्षम असलेल्या सर्वच संस्थांना अर्ज करण्याची परवानगी होती. त्यामुळे लॉटरीमध्ये ज्या संस्थेचे नाव येईल; त्या संस्थेला कंत्राट मिळू लागले. मात्र या पद्धतीमुळे कामाचा दर्जा घसरला. कारण लॉटरीमुळे पुरेसे मनुष्यबळ व आर्थिकदृष्ट सक्षम नसलेल्या मात्र तरीही कंत्राट मिळालेल्या संस्थाचा समावेश अधिक होत होता. शिवाय अनुभवी आणि सक्षम संस्था यातुन बाहेर पडल्या होत्या.
>सहाऐवजी तीन महिनेच काम
दत्तक वस्ती योजनेमध्ये दर सहा महिन्यांनी लॉटरी काढण्यात येत असल्याने अप्रशिक्षित लोकांना काम समजून घेण्यात आणि विभागाची माहिती मिळविण्यात तीन ते चार महिने जातात. मात्र काम समजल्यानंतरही लॉटरी पद्धतीत पुढे आपल्याला काम मिळेल की नाही? याची शाशवती नसल्याने या संस्थेचे कंत्राटदार दोन ते तीन महिने आधीच काम बंद करतात. त्यामुळे कचरा उचलला जात नाही.
>उपाययोजना
मुंबई २२७ वॉर्ड असुन प्रत्येक वॉर्डमध्ये कमीतकमी चार ते पाच दत्तक वस्ती संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी प्रशिक्षित आणि अनुभवी संस्थाना लॉटरीमध्ये न टाकता त्यांना कामाची मोकळीक देणे. नवीन संस्थांची लॉटरीमार्फत निवड करून त्यांच्यावर जबाबदारी सोपविणे.
लॉटरीची मुदत वाढविणे जेणेकरून नवीन संस्थाना काम करण्यास वेळ मिळेल.
उत्तम काम करणाऱ्या संस्थांना सन्मानित करणे.

Web Title: Deletion of waste management due to the lottery system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.