राजकीय वादात उतरले विमान, श्रेयवादावरून दीपक केसरकर-राणे यांच्यात जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 05:04 IST2018-09-13T05:04:25+5:302018-09-13T05:04:49+5:30
चिपी विमानतळावर चाचणीसाठी बुधवारी सकाळी पहिले विमान उतरताच राजकीय वादाला तोंड फुटले.

राजकीय वादात उतरले विमान, श्रेयवादावरून दीपक केसरकर-राणे यांच्यात जुंपली
सिंधुदुर्गनगरी : येथील चिपी विमानतळावर चाचणीसाठी बुधवारी सकाळी पहिले विमान उतरताच राजकीय वादाला तोंड फुटले. या विमानतळामुळे नजिकच्या काळात जिल्ह्याचा कायापालट होईल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. तर श्रेय लाटण्यासाठी बेकायदेशीररित्या खासगी विमान उतरवून नौटंकी केली आहे, असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला.
सकाळी ११.५० वाजता चिपी विमानतळावर गणेशमूर्तीसह आलेल्या पहिल्या विमानाचे यशस्वीरित्या लॅण्डींग होताच ग्रामस्थांनी जल्लोशात स्वागत केले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते. विमानतळावर कार्गो हबसाठी वाटाघाटी सुरू आहेत. या विमानतळाच्या माध्यमातून आंबा व मासे तसेच इतर कृषी मालाच्या निर्यातीबाबत प्रयत्न सुरू आहे. एक स्टिम्युलेटर व एव्हिएशन स्कूल याच ठिकाणी सुरू होण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. चिपी विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या त्यांच्या मुलांना नोकरीसाठी कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येईल, असे आश्वासन केसरकर यांनी ग्रामस्थांना दिले.
> खासगी विमान चाचणी बेकायदा : राणेंचा आरोप
जिल्ह्याच्या विकासात कायम खो घालणारी शिवसेना व पालकमंत्री केसरकर यांनी फुकाचे श्रेय लाटण्यासाठी अनधिकृतपणे व बेकायदेशीररित्या खाजगी विमान चिपी विमानतळावर उतरवून नौटंकी केली आहे. असा आरोप खासदार राणे यांनी कुडाळ येथे केला.