अतुल कुलकर्णी,लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे द्यायची, हा निर्णय त्यांच्याशी आणि परिवाराशी चर्चा करूनच झाला. सुनेत्रा पवार यांना याविषयी विचारले असता त्यांनी होकार दिला. मगच आम्ही पुढची प्रक्रिया पार पाडली, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
सुनेत्रा यांच्या शपथविधीविषयी आपल्याशी कसलीही चर्चा झाली नव्हती. आपल्याला काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल, असे विचारले असता खा. पटेल म्हणाले, आमच्यासाठी परिवार म्हणजे अजित पवार यांचा परिवार. त्यांच्या निधनानंतर, त्यांच्या परिवाराशी बोलूनच हा निर्णय घेतला गेला. आजच शपथविधी घ्या, असे आम्ही सांगितले नव्हते. तीन दिवसांचा दुखवटा संपल्यानंतर चौथ्या दिवशी हा निर्णय घेता येईल, असा होकार आल्यानंतरच आम्ही पुढे गेलो. अशावेळी त्यांना न विचारता आम्ही निर्णय कसा घेऊ? असेही खा. पटेल म्हणाले. राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, त्याबद्दल नेमके काय झाले? यावर खा. पटेल म्हणाले, अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच अनेक नेत्यांनी एका सुरात एकत्र येण्यावरून बोलणे सुरू केले होते.
अंत्यविधी होण्यापूर्वीच विलीनीकरणाची चर्चा
- विलीनीकरणाबाबत जे काही बोलणे सुरू होते ते दोन दिवसांनी बोलता आले नसते का? त्याचदिवशी हे सगळे सुरू झाल्यामुळे अजित पवार यांचा परिवार डिस्टर्ब झाला होता. हे सुरू असताना अजितदादांच्या परिवाराविषयी, वहिनींविषयी काहीच न बोलता फक्त विलीनीकरणाचीच गोष्ट मांडली जात होती. त्यामुळे दादांचा व राष्ट्रवादी पक्षाचा परिवार अस्वस्थ होता.- आम्हा सगळ्यांच्या मनात खंत होती. पक्षाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे, अशी चर्चा सुरू झाली. ही गोष्ट सुनेत्रा वहिनींना सांगितली. त्यांनीदेखील जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिली.-३ त्यानंतरच माझ्यासह, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि पक्षातील सर्वच नेत्यांची चर्चा करून, विचारविनिमय करून निर्णय घेतला.
मग बैठकीला तटकरे किंवा मला का बोलावले नाही?
विलीनीकरणाच्या बैठकीबद्दलचा जोव्हिडीओ व्हायरल होत आहे, त्याकडे लक्ष वेधले असता खा. पटेल म्हणाले, 'माझ्या माहितीप्रमाणे कृषी प्रदर्शनाच्या वेळी त्या सगळ्यांची भेट झाली होती. जर विलीनीकरणाची ती बैठक होती, तर राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून मी आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे, त्यात असायला हवे होते. त्याविषयी मला जास्त कल्पना नाही. जास्तीत जास्त घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तयारी दर्शवली होती. कारण आमच्या आमच्यातच मत विभाजन होऊ नये म्हणून आम्ही तो निर्णय घेतला होता. महापालिकेच्या वेळी कशी आणि कुठे समीकरणे जोडली, मोडली? हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यावर मी जास्त काय बोलावे? असेही खा. पटेल शेवटी म्हणाले.
Web Summary : Praful Patel stated Sunetra Pawar's Deputy CM decision was made with her family's consent. He added unification talks began prematurely, disturbing Ajit Pawar's family. Patel questioned exclusion from key meetings.
Web Summary : प्रफुल्ल पटेल ने कहा, सुनेत्रा पवार का उपमुख्यमंत्री पद का निर्णय उनके परिवार की सहमति से हुआ। उन्होंने कहा कि एकीकरण की बात समय से पहले शुरू हो गई, जिससे अजित पवार का परिवार परेशान था। पटेल ने महत्वपूर्ण बैठकों से बाहर रखने पर सवाल उठाए।