मायलेकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By Admin | Updated: July 14, 2016 04:00 IST2016-07-14T04:00:27+5:302016-07-14T04:00:27+5:30
मुलाचे हृदयविकाराने निधन झाल्याचे समजताच धक्क्याने आजारी असलेल्या आईनेदेखील प्राण सोडल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना खालापूर गावात घडली.

मायलेकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
वावोशी/रायगड : मुलाचे हृदयविकाराने निधन झाल्याचे समजताच धक्क्याने आजारी असलेल्या आईनेदेखील प्राण सोडल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना खालापूर गावात घडली.
गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक दिवंगत गोविंदराव बोंदाऱ्डे यांच्या पत्नी कमला (८६) काही दिवसांपासून आजारी होत्या. कमलाबाई यांना खोपोलीतील डोंगरे रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री यांचा मोठा मुलगा प्रकाश (६५) कु टुंबासहआईला जेवणाचा डबा घेऊन गेले होते. सोमवारी आठ वाजण्याच्या सुमारास प्रकाश आईच्या शेजारी स्टूलवर बसत होते. त्या वेळी स्टूलचा अंदाज न आल्यामुळे पाठीमागे तोल जाऊन ते कोसळले. त्या वेळी प्रकाश यांच्या डोक्याच्या मागील बाजूस लोखंडी बेडचा कोपरा लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. डोंगरे रुग्णालयातील डॉक्टर कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे प्रकाश यांना तातडीने खोपोलीतील डॉ. मोहिते रुग्णालयात हलविण्याचे ठरले. याच दरम्यान प्रकाश यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने खोपोलीतील रुग्णालयात पोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुलाला लागलेला मार पाहून व्यथित झालेल्या कमलाबाई यांनी नातेवाईकांकडे प्रकाशच्या तब्येतीची विचारपूस केली. मुलाच्या बाबतीत काहीतरी अघटित घडलेय, याची कल्पना आल्यानंतर सोमवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास कमलाबाई यांनादेखील हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले. काही तासांच्या अंतराने बोंदाऱ्डे कुटुंबावरओढावलेल्या संकटामुळे संपूर्ण खालापूर गाव सुन्न झाले. मंगळवारी शोकाकुल वातावरणात आई आणि मुलावर खालापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)