पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 15:14 IST2024-05-24T15:13:14+5:302024-05-24T15:14:03+5:30
Devendra Fadnavis News: डोंबिवली एमआयडीसीतील उद्योगांसंदर्भात उद्धव ठाकरेंनी काही केले नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
Devendra Fadnavis News: कल्याणी नगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर 'बाळा'ची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली, तर 'बाळा'चे वडील विशाल अग्रवाल याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले. काँग्रेस आमदार तसेच पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहे. या टीकेचा देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांना रवींद्र धंगेकर यांनी लिहिलेल्या पत्राबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी असे पत्र पाहिले नसल्याचे सांगितले. तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाचे राजकीयकारण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे, ती सर्व कारवाई पोलिसांनी केली आहे. तसेच जुवेनाइल जस्टिस बोर्डाने चुकीचा निर्णय दिला होता, त्याच्या विरोधात वरच्या कोर्टात जाऊन तो निर्णय बदलून घेतला आहे. पहिल्यांदा पब चे मालक आणि मुलाचे वडील यांना ही अटक झाली आहे, कठोर कारवाई झाली आहे. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणे हे योग्य नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले.
या सर्व उद्योगांना पर्यायी जागा दिली पाहिजे
डोंबिवलीएमआयडीसीत रासायनिक कारखान्यातील रिअॅक्टरचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली. यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कुठले उद्योग एका दिवसात हलवले जात नाहीत. उद्योग तिथून हलवले गेले पाहिजे, यासंदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात काही केले नाही. त्यांची एक तरी फाईल दाखवा, ज्यात त्यांनी काही निर्णय केला आहे. मात्र घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन या सर्व उद्योगांना पर्यायी जागा दिली पाहिजे. सरकार त्यासाठी पुढाकार घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनाचे श्लोक महाराष्ट्र मध्ये वर्षानुवर्षी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात. त्यामुळे ते अभ्यासक्रमात आणले जात आहे की नाही हे मला माहिती नाही. मात्र विनाकारण संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.