“२०१७ मध्ये कोणत्या एजन्सीला घाबरुन आमच्यासोबत येत होते”; फडणवीसांचा पवारांना थेट प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2023 19:20 IST2023-10-05T19:18:10+5:302023-10-05T19:20:37+5:30
Devendra Fadnavis Replied Sharad Pawar: आता सगळे गेल्यानंतर आरोप करणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

“२०१७ मध्ये कोणत्या एजन्सीला घाबरुन आमच्यासोबत येत होते”; फडणवीसांचा पवारांना थेट प्रश्न
Devendra Fadnavis Replied Sharad Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा काही गौप्यस्फोट केले. २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याची कल्पना शरद पवारांची होती. सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी इच्छूक नसल्याचे पत्र माझ्या घरी टाइप झाले. शरद पवारांनी दुरुस्त्या केल्यानंतर ते राज्यपालांना दिले, असे अनेक दावे देवेंद्र फडणवीस यांनी केले. यानंतर यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. यावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना थेट प्रश्न विचारला आहे.
राष्ट्रवादीचे नेते तपास यंत्रणांना घाबरून भाजपसोबत गेल्याचा दावा शरद पवार यांनी केला. यानंतर या दाव्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना, शरद पवार यांनी २०१९ मध्ये आमच्याशी चर्चा केली होती. ते आमच्यासोबत यायला तयार होते. त्याआधी २०१७ मध्येही आमच्याशी चर्चा केली होती. तेव्हा कोणत्या एजन्सीला घाबरून त्यांनी चर्चा केली होती? तेव्हा पवारसाहेब कोणत्या एजन्सीला घाबरून आमच्यासोबत येत होते का, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आता सगळे गेल्यानंतर आरोप करणे योग्य नाही
शरद पवार यांच्या मान्यतेनेच आम्ही भाजपला पाठिंबा दिला आहे असे अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले आहे. शरद पवार यांच्याशी चर्चा करून आम्ही सह्या करूनच आलो आहोत हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. आता सगळे गेल्यानंतर आरोप करणे योग्य नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राजकारणात कुठे ना कुठे संधी मिळतेच. अजितदादा हे मोठे नेते आहेत. आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठिशी आहेत. मात्र, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहणार आहेत, आम्ही सर्व निवडणूका एकत्रित लढणार आहोत. मी अतिशय क्लिअर बोललो आहे. काही लोकांना माझे वाक्य समजले नाही. त्यांनी समजून घेतले पाहिजे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.