राज ठाकरेंच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 14:21 IST2023-05-30T14:20:56+5:302023-05-30T14:21:48+5:30
Devendra Fadnavis-Raj Thackeray: रात्री अचानक देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर पोहोचले. तब्बल सव्वा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

राज ठाकरेंच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? देवेंद्र फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली
Devendra Fadnavis-Raj Thackeray: अलीकडील काळात राज्यात अनेकविध राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकाबाजूला लोकसभा निवडणुकीसाठी पक्षांनी जय्यत तयारीला सुरुवात केली असून, दुसरीकडे लोकसभेसोबत राज्यातील विधानसभा निवडणुका होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक सोमवारी रात्री मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थावरील या भेटीनंतर राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षभरात राज्यात घडलेल्या राजकीय उलथापालथीदरम्यान भाजप आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढली होती. मात्र मागच्या काही दिवसांमध्ये काही मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला भाजपच्या नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील संबंधांमध्ये पुन्हा एकदा दुरावा आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. भाजपा आणि मनसेमध्ये जवळीक वाढल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये मुंबई महानगरपालिका तसेच आगामी निवडणुकांसाठी युती होणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. या भेटीबाबत आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गप्पा मारायला बसू असे ठरले होते, तो मुहूर्त निघाला
देवेंद्र फडणवीस रात्री दहाच्या सुमारास राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. त्यांची ही भेट तब्बल सव्वा तासांची होती. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, अराजकीय गप्पा मारण्यासाठी शिवतीर्थवर गेलो होतो. बऱ्याच दिवसांपासून आमचे ठरले होते की एक दिवस गप्पा मारायला बसू आणि काल तो मुहूर्त निघाला. असे ठरले होते की राजकीय सोडून गप्पा करायच्या. गप्पा या अराजकीय असतात, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठे राजकीय नेते भेटले आणि राजकारणावर चर्चा झालीच नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर वेगवेगळे तर्क-वितर्क लढवले जात असून, नवे कयास बांधले जात आहेत.