दाऊदचा पाय कापणार?
By Admin | Updated: April 26, 2016 07:25 IST2016-04-26T06:18:29+5:302016-04-26T07:25:23+5:30
पायाला गँगरिन झाल्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पलंगाला खिळला असल्याची चर्चा गुन्हेगारी जगतात सुरू आहे

दाऊदचा पाय कापणार?
मुंबई : पायाला गँगरिन झाल्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पलंगाला खिळला असल्याची चर्चा गुन्हेगारी जगतात सुरू आहे. तथापि, मुंबईतील गुप्तचर सूत्रांनी या घडामोडीबाबत कल्पना नसल्याचे व दिल्लीतील समपदस्थांकडूनही याला दुजोरा न मिळाल्याचे स्पष्ट केले.
दुसरीकडे दाऊदच्या मुंबईतील हस्तकांनीही या माहितीची शहानिशा होऊ शकली नसल्याचे सांगितले. दाऊदच्या एका पायाला गँगरीन झाले असून संसर्ग शरीराच्या इतर भागात पसरू न देण्यासाठी पाय कापणे हा एकच पर्याय उरला असल्याची चर्चा सोमवारी सायंकाळी सुरू झाली.
कराचीतील लियाकत रुग्णालय आणि तेथील लष्करी रुग्णालय यांच्यातर्फे संयुक्तरित्या दाऊदवर उपचार करण्यात येत आहेत. दाऊद आजारी असल्याची माहिती आल्यानंतर दिल्लीतील गुप्तचर अधिकाऱ्यांकडे याबाबत संपर्क साधला; मात्र रात्री उशिरापर्यंत त्याला दुजोरा मिळू शकला नाही, असे महानिरीक्षक दर्जाच्या एका आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले.