पतीला चाकूचा धाक दाखवून पत्नीवर बलात्कार

By Admin | Updated: March 1, 2016 01:32 IST2016-03-01T01:32:03+5:302016-03-01T01:32:03+5:30

अकोला जिल्ह्यातील घटना, आदिवासी महिलेवर अत्याचार.

Daughter raped wife by knife | पतीला चाकूचा धाक दाखवून पत्नीवर बलात्कार

पतीला चाकूचा धाक दाखवून पत्नीवर बलात्कार

बाश्रीटाकळी (अकोला): बाश्रीटाकळी तालुक्यातील सिंदखेड मोरेश्‍वर येथे आदिवासी महिलेवर दोन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री घडली. या नराधमांनी महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवून तिच्याशी कुकर्म केले.
अकोला येथील जगदीश तारापूरकर यांच्या सिंदखेड मोरेश्‍वर येथील शेतात एक वर्षापासून आदिवासी दाम्पत्य दोन लहान मुलांसह राहते. रविवारी रात्री १0 वाजता हे कुटुंब जेवण करून झोपले. रात्री ११ वाजताच्या दरम्यान कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्याने त्यांना जाग आली. तेवढय़ात दोन अनोळखी इसम तेथे आले. त्यापैकी एकाने महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखविला. त्याने पतीच्या मानेवर चाकू लावल्याचे पाहून पीडित महिलेने शेतात धाव घेतली. त्यावेळी दुसर्‍या आरोपीने धावत जाऊन महिलेला पकडले आणि दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. सोमवारी सकाळी आदिवासी दाम्पत्याने बाश्रीटाकाळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आदिवासी दाम्पत्य हे अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रहिवासी आहे. महिलेवर बलात्कार करूनच आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनी शेतातील फवारणी पंप, मोबाइल संच व बॅटरी पळविली. पोलिसांनी राजंदा येथील शंकर मुंडेसह दोघांविरुद्ध भादंविचे कलम ३९२ (लुटणे), ३७६ (ड) (बलात्कार), ४४७ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तपास ठाणेदार ज्ञानेश्‍वर जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कोरचे व हेड कॉन्स्टेबल संजय सोनवणे करीत आहेत.

Web Title: Daughter raped wife by knife