दारुच्या नशेत पित्यानेच केली बायको-मुलाची हत्या

By Admin | Updated: March 28, 2017 15:07 IST2017-03-28T15:07:17+5:302017-03-28T15:07:17+5:30

लातूरमध्ये एकाने दारूच्या नशेत पत्नी-मुलाची डोक्यात धोंडा घालून त्यांची निर्घृण हत्या केली.

Daughter of drunken father murdered wife and son | दारुच्या नशेत पित्यानेच केली बायको-मुलाची हत्या

दारुच्या नशेत पित्यानेच केली बायको-मुलाची हत्या

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 28 - निलंगा तालुक्यातील केळगाव हे गाव ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी हादरले.  एका वृद्घाने दारु प्यायल्यानंतर किरकोळ भांडणातून आपल्या बायको आणि मुलाची हत्या केली आहे. हे मायलेक झोपेत असतानाच पहाटे त्यांच्या डोक्यात धोंडा घालून हत्या केली. 
 
यानंतर सकाळी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना सर्व घटनाक्रम सांगितला. केळगाव येथे हरीबा सूर्यवंशी (वय ६८) राहतात. सोमवारी रात्री त्यांनी व त्यांचा मुलगा सावन (वय २८) दोघंही दारू प्यायले होते. किरकोळ कारणावरून घरात भांडण सुरू झाले. या वादातून हरीबाने स्वतःची पत्नी भागीरथी सूर्यवंशी (वय ६०) आणि मुलगा सावन सूर्यवंशी यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली. 
 
झोपले असताना त्यांने त्यांच्या डोक्यात दगड घातला. पिता पुत्र दोघंही दारू प्यायले होते.  दारू प्यायल्यानंतर दोघांमध्ये नेमका कशावरुन वाद झाला याचा तपास सध्या सुरू आहे.  मात्र, राग अनावर झाल्याने हरीबाने पत्नी व मुलाची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
यानंतर सकाळी स्वतःच निलंगा पोलीस ठाण्यात हजर होऊन घडला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह रुग्णालयात पाठवले. पुढील चौकशी सुरू आहे.  
 
दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गावात एकाही कुटुंबाने गुढी उभारली नाही. 
तर दुसरीकडे, सावनला दारूचे व्यसन असल्यानंच त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती.  सावनला चार बहिणी व एक भाऊ आहे. भाऊ रोजगारानिमित्त लातूरला राहतो तर चारही बहिणी विवाहीत आहेत.

Web Title: Daughter of drunken father murdered wife and son