धोकादायक माळशेज घाट
By Admin | Updated: August 1, 2016 01:47 IST2016-08-01T01:47:39+5:302016-08-01T01:47:39+5:30
विशाखापट्टणम महामार्ग क्र.२२२ वरील नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात आजही अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे.

धोकादायक माळशेज घाट
खोडद : विशाखापट्टणम महामार्ग क्र.२२२ वरील नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात आजही अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. या दरडी कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेशकुमार कल्याणकर यांनी गुरुवारी (दि. २८) माळशेज घाटात येऊन संपूर्ण घाटाची पाहणी केली.
माळशेज घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरडी कोसळणे हे आता नित्याचेच झाले आहे.
मात्र, घाटात कोसळणाऱ्या या दरडींमुळे होणारे अपघात व जीवितहानी भयावह आहे. चालू वर्षी जुलै महिन्यात मुसळधार झालेल्या पावसामुळे दर ८ दिवसांनी घाटात दरडी कोसळण्याच्या ३ घटना घडल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या वतीने घाटातील कोसळलेल्या दरडी बाजूला काढण्याचे काम करण्यात आले.
माळशेज घाटात सध्या किमी ९० (छत्री पॉइंट) पासून किमी ९४ पर्यंत (घाट संपतो तिथपर्यंत) ठिकठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. या दरम्यानच्या सर्व धोकादायक दरडी व मोकळे झालेले मोठे दगड मनुष्यबळाचा वापर करून काढण्याचे काम मागील ८ दिवसांपासून सुरू आहे. या कामासाठी सुमारे ४० मजूर लावण्यात आले आहेत.
घाटात सतत असणारा पाऊस, वारा व धुके यामुळे हे काम करण्यास विलंब होत आहे. पाऊस उघडीप देईल त्यानुसार हे काम सुरू आहे. येत्या गुरुवारपासून (दि.४) घाटातून होणारी वाहतूक ठिकठिकाणी थांबवून, काही ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु ठेवून हे काम करण्यात येणार आहे. मात्र या कामासाठी घाटातील वाहतूक बंद केली जाणार नाही.’ असे राष्ट्रीय महामार्गाचे स्थापत्य अभियंता एस. के. चौधरी यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महेशकुमार कल्याणकर व अन्य अधिकाऱ्यांनी गुरुवारी (दि. २८) माळशेज घाटात येऊन संपूर्ण घाटाची पाहणी करून राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. (वार्ताहर)
>गेल्या वर्षी माळशेज घाटात ९१.५०० किमीजवळ गणेशमंदिराच्या वरच्या बाजूला डोंगरकड्यांवरून कोसळणारे दगड झेलून धरण्यासाठी डोंगरकड्याला सुमारे ६० मीटरपर्यंत जाळी लावण्यात आली आहे.