धोकादायक इमारतीचा भाग कोसळला

By Admin | Updated: July 31, 2016 04:54 IST2016-07-31T04:54:31+5:302016-07-31T04:54:31+5:30

मुसळधार पावसामुळे मोडकळीस आलेल्या इमारती अधिकच धोकादायक ठरू लागल्या आहेत.

Dangerous building collapses | धोकादायक इमारतीचा भाग कोसळला

धोकादायक इमारतीचा भाग कोसळला


मुंबई : मुसळधार पावसामुळे मोडकळीस आलेल्या इमारती अधिकच धोकादायक ठरू लागल्या आहेत. गिरगाव येथील पहिल्या भटवाडीतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्याचे छप्पर बाजूच्या इमारतीवर शनिवारी सकाळी कोसळले. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तिसऱ्या मजल्यावरील कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे जीवितहानी टळली.
गिरगाव येथील पहिल्या भटवाडीत आर्यन शाळेच्या बाजूला पाठारे हाऊस ही तीन मजली इमारत आहे. तळमजला व पहिल्या मजल्याचा व्यावसायिक वापर होत असून एक कुटुंब तिसऱ्या मजल्यावर राहत आहे. हा तिसरा मजला धोकादायक असल्याने म्हाडाने संबंधितांना सन २००० मध्ये नोटीस बजावली होती. मात्र वारंवार नोटीस मिळूनही घरमालकाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले. परिणामी शनिवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास या इमारतीचे छप्पर शेजारील इमारतीवर कोसळले.
पाठारे हाऊसला खेटून उभ्या असलेल्या सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील घर यामुळे कोसळले. या दुर्घटनेचा अंदाज येताच पाठारे हाऊसच्या तिसऱ्या मजल्यावरील रहिवासी तत्काळ इमारतीबाहेर पडले. मात्र बेसावध क्षणी घडलेल्या या घटनेमुळे शेजारच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील नाईक कुटुंब घाबरले. बाहेर पडता न आल्याने ते या धोकादायक निवासातच अडकून राहिले. याची खबर मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब व दोन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या. 
>...आणि नाईक कुटुंब बचावले
आपल्यावर एवढे मोठे संकट ओढावणार असून आपल्या जिवावर बेतू शकते, याची किंचितही खबर नसलेल्या नाईक कुटुंबीयांचा दिवस नेहमीप्रमाणेच सुरू झाला.
मात्र अचानक शेजारील इमारतीचे छप्पर त्यांच्या घरावर कोसळल्याने ते बिथरले. क्षणभर काय घडले हे त्यांना कळलेच नाही. आपल्या कुटुंबाचे व आपले प्राण वाचविणे हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते.
तेवढ्यात अग्निशमन दलाचा मदतीचा हात त्यांच्यासाठी पुढे आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीचा ढिगारा बाजूला करून तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या नाईक दाम्पत्य व त्यांच्या मुलीला बाहेर काढले.
>कुठे जाणार माहीत नाही?
गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही भन्साली यांना दुरुस्ती करून घ्या, असे सांगत होतो. पण, त्यांनी दुर्लक्ष केले. म्हाडाच्या नोटीस येऊनही दुरुस्ती करून घेतली नाही. गेल्या काही दिवसांपासून ते स्वत:च घराच्या काही भागाची दुरुस्ती करून घेत होते. अनेकदा त्यांच्या टाक्यांचे नळ सुरू राहिल्याने आमच्या घरात, गच्चीवर पाणी यायचे. याविषयी तक्रार केली होती. शेवटी आज हा प्रकार घडला. आता आम्ही कुठे जाणार माहीत नाही. मी, माझे पती आणि मुलगी घरात होतो. मी सकाळची आवराआवर करत होते. माझे पती टीव्ही पाहत होते. मुलगी नुकतीच आंघोळ करून बाहेर आली आणि मोठा आवाज झाला. बाजूच्या इमारतीचा भाग आमच्या घरावर कोसळला आम्ही कसेबसे गॅलरीत आल्यामुळे वाचलो. बाजूच्यांना आधीच कल्पना आली होती. कारण, त्यांच्या घरात माती पडायला लागली असल्यामुळे ते खाली गेले होते. आम्ही मात्र अडकलो. - विद्या नाईक (रहिवासी)
>भय इथले संपत नाही...
शहर भागातील अनेक जुन्या इमारती धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. तरीही डोक्यावरचं छप्पर जाण्याच्या भीतीने शेकडो रहिवासी आपला जीव मुठीत घेऊन जगत असतात. पाठारे हाऊसचे छप्पर कोसळल्याच्या आवाजाने अशीच धडकी आसपासच्या इमारतींमधील रहिवाशांना भरली. हे संकट आपल्यावर नाही तर बाजूच्या इमारतीवर कोसळले असल्याचे दिसून येताच माटलावाला इमारत व आसपासच्या इमारतींतील रहिवाशांचा जीव भांड्यात पडला. मात्र अशी वेळ आपल्यावरही येऊ शकते, या भयाने ते धास्तावले आहेत.
पहिल्या भटवाडीतील पाठारे हाऊसचा छपराचा भाग कोसळल्याने या ठिकाणी एकच घबराट पसरली होती. पावणेनऊच्या सुमारास घरात काम करत असताना मोठा आवाज झाला. त्या वेळी धस्सच झाले. बाजूच्या माटलावाला इमारतीचा मोठा भाग सीताराम निवासवर कोसळल्याचे वाटले. घाईत बाहेर आल्यावर समोर धुरासारखे वाटत होते, असे प्रत्यक्षदर्शी वीणा साव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पाठारे निवासच्या बाजूच्या तीन इमारती सोडून चार मजली माटलावाला निवास ही इमारत आहे. त्याच्या तळ मजल्यावर आणि चौथ्या मजल्यावर असे दोनच भाडेकरू राहतात. बाकी सर्वांनी ही इमारत सोडली आहे. ही इमारत खासगी असल्याने म्हाडा या इमारतीची दुरुस्ती करू शकत नाही. पण स्वत: मालकही या इमारतीची दुरुस्ती करत नाही. माटलावाला इमारतीच्या दोन्ही बाजूला खेटून इमारती आहेत. या दोन्ही इमारतींवर मध्येमध्ये माटलावाला इमारतीची काही ढेपळं पडत असतात, असे साव यांनी सांगितले. 
>संकटाची नांदी
माटलावाला निवासाच्या चौथ्या मजल्यावरील इमारतीच्या वरच्या भागाला तडे गेले आहेत. त्याचा काही भाग हा आमच्या घराच्या गॅलरीत पडतो. पण मालक काहीच करत नाही. आज आमच्या बाजूच्या इमारतीचा काही भाग कोसळला. उद्या हीच परिस्थिती आमच्यावर ओढवू शकते. आम्ही जीव मुठीत घेऊन जगतो, असे जयश्री वासुदेव यांनी सांगितले.

Web Title: Dangerous building collapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.