टाटा कम्युनिकेशनला दणका
By Admin | Updated: April 29, 2016 04:18 IST2016-04-29T04:18:33+5:302016-04-29T04:18:33+5:30
इंटरनेट सेवा बंद असूनही ग्राहकाकडून आठ महिन्याचे बिल घेणाऱ्या टाटा कम्युनिकेशन इंटरनेट सर्व्हिस लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने फटकारले आहे.

टाटा कम्युनिकेशनला दणका
ठाणे : इंटरनेट सेवा बंद असूनही ग्राहकाकडून आठ महिन्याचे बिल घेणाऱ्या टाटा कम्युनिकेशन इंटरनेट सर्व्हिस लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने फटकारले आहे. पाच हजार दंड तसेच २० हजार ६१६ रूपये बिल सहा टक्के व्याजासह परत करण्याचे आदेश दिले आहेत.
ठाण्यात राहणारे देवेश लारका यांनी २००६ मध्ये टाटा कम्युनिकेशनकडे ५७ हजार इन्स्टॉलेशन चार्जेस भरून इंटरनेट सुविधा घेतली होती. मात्र इंटरनेट फेब्रुवारी २००८ पासून बंद झाले. देवेश यांनी नोडल आॅफिसर यांच्याकडे तक्रार केली असता केबल तुटल्यामुळे कनेक्शन खंडीत केले आहे. कंपनीकडून परवानगी मिळाल्यानंतर दुरूस्ती होईल, असे सांगितले. परंतु त्यानंतरही कंपनीकडून इंटरनेटचे बिल आले. त्यामुळे देवेश यांनी कंपनीविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली. तर २८ फेब्रुवारीला अभियंचा समस्या सोडवण्याच्या प्रयत्नात असताना देवेश यांनी २९ फेब्रुवारीला तक्रार दाखल केली. तसेच मार्चमध्येच पूर्ण केबल बदलून इंटरनेट कनेक्शन पूर्ववत केल्याचे कंपनीने सांगितले.
कागदपत्र, पुरावे यांची पडताळणी केली असता एप्रिल २००८ आणि मे २००८ मध्ये नोडल आॅफिसर यांनी इंटरनेट कनेक्शन रिस्टोर करणे अशक्य असल्याचे मेलद्वारे सांगितले आहे. तर १२ डिसेंबर २००८ मध्ये कंपनीने दिलेल्या पत्रानुसार एप्रिल २००८ पासून इंटरनेट सुविधा खंडीत असून जमा असलेली रेंटची रक्कम परत देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे सदोष सेवा देऊन कंपनीने देवेश यांचे नुकसान केले आहे, असे मंचाने स्पष्ट केले. देवेश यांना इन्स्टॉलेशन चार्जेस ५२ हजार तसेच १० महिन्यांचे बिल २० हजार ६१६ व्याजासह परत करावे आणि पाच हजार तक्रार खर्च द्यावा असे आदेश मंचाने टाटा कम्युनिकेशन इंटरनेट सर्व्हिस लिमिटेडला दिले आहेत. (प्रतिनिधी)