पुणे : ‘मुलांची उत्तम काळजी घेण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक, घरगुती वातावरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण’, अशी जाहिरातबाजी करत प्रत्यक्षात मुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या एका प्ले ग्रुपला ग्राहक मंचाने दणका दिला आहे. आपल्या नातवंडांची हेळसांड झाल्याने एका आजीने ग्राहक मंचाकडे तक्रार केल्यानंतर, या प्ले ग्रुपला दंड ठोठावण्यात आला आहे. रेहाना झहिरुद्दीन शेख (रा. फुरसुंगी) यांना दोन ते अडीच वर्षांची तीन नातवंडे आहेत. या तीनही मुलांचे आई-वडील नोकरीनिमित्त बाहेर असतात. त्यामुळे प्ले स्कूलचे नाव, जाहिरात व पत्रक वाचून शेख यांनी तिन्ही नातवंडांचा उंड्री येथील आॅरेंज आय. व्ही. प्ले स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यासाठी प्रत्येकी १८ हजार ५०० रुपये शुल्क भरले.शाळेत विविध सुविधा असल्याचे जाहिरातीत म्हटले होते. काळजी घेण्यासाठी विशेष तज्ज्ञ असल्याचेही सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र मुलांची योग्य ती काळजी घेतली नाही. मुलांचे डायपर व कपडे बदलले जात नव्हते, डबासुद्धा खायला दिला जात नव्हता. मुलांची स्वच्छता राखणे, पालनपोषण करणे, दैनंदिन काळजी घेणे, यांपैकी कोणतीच जबाबदारी पार पाडलेली नव्हती.दोन दिवसांतच मुलांची रया गेल्याने शेख यांनी आपल्या नातवंडांचे प्रवेश शाळेने रद्द करावे व शुल्क परत करावे, असे मुख्याध्यापिकेला सांगितले. मात्र, त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या आजींनी स्कूलची मुख्याध्यापक व अध्यक्षांविरुद्ध ग्राहक मंचात तक्रार दाखल केली होती. मंचाने डॉक्टरांचे सर्टिफिकेट ग्राह्य धरून मुलांची काळजी न घेतल्याचे दिसत आहे, असे स्पष्ट करत, संबंधित प्ले ग्रुपने फीचे ५५ हजार रुपये, नुकसानभरपाई म्हणून १० हजार व तक्रारीचा खर्च ५ हजार रुपये द्यावेत, असा आदेश मंचाच्या अध्यक्षा अंजली देशमुख व सदस्य एस. के. पाचरणे यांनी दिला आहे.
दुर्लक्ष करणाऱ्या प्ले ग्रुपला दणका
By admin | Updated: November 29, 2015 02:16 IST