डी. जी. इन्फ्रास्ट्रक्चर कारखान्याला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 03:37 IST2017-01-21T03:37:06+5:302017-01-21T03:37:06+5:30
डी. जी. इन्फ्रास्ट्रक्चर या गॅल्वाईज पत्रे उत्पादन करणाऱ्या कारखाना प्रशासनाने रातोरात कारखान्याला टाळे ठोकून गाशा गुंडाळला.

डी. जी. इन्फ्रास्ट्रक्चर कारखान्याला टाळे
महाड : महाड औद्योगिक क्षेत्रातील विस्तारित कक्षातील डी. जी. इन्फ्रास्ट्रक्चर या गॅल्वाईज पत्रे उत्पादन करणाऱ्या कारखाना प्रशासनाने रातोरात कारखान्याला टाळे ठोकून गाशा गुंडाळला. कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता कारखाना व्यवस्थापनाने कारखाना बंद केल्यामुळे सुमारे ८२ कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. या बेकायदा टाळेबंदीच्या विरोधात कामगारांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे.
विशेष म्हणजे या कारखान्यात काम करणारे बहुतांश कामगार हे स्थानिक असल्याने या कामगारांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. बुधवारी रात्री अचानक कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या प्रवेशद्वारावर कारखाना बंदची नोटीस लावून कारखान्याला टाळे ठोकले. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामगार कामावर आले असता कारखाना बंद असल्याचे सांगण्यात आले. या कारखान्यात कामगार उत्कर्ष सभा आणि भारतीय कामगार सेना अशा दोन कामगार संघटना कार्यरत असून व्यवस्थापनाने करारानुसार पगारवाढ केली नसल्याने कामगार उत्कर्ष सभेचे युनिट अध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. या कारखान्यात उत्पादित केलेले पत्रे व अन्य उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर मागणी होती. मात्र कारखान्याला रातोरात कुलूप ठोकून व्यवस्थापनाने गाशा गुंडाळल्यामुळे कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
>या कारखान्यातील कामगारांना अंधारात ठेवून व्यवस्थापनासमोर कारखाना बंद करण्याचा घेतलेला निर्णय बेकायदेशीर असून कामगारांवर अन्याय करणारा आहे.
- माजी आ. माणिक जगताप, उपाध्यक्ष, कामगार उत्कर्ष सभा