उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचं रविवारी दुपारच्या सुमारास अपघाती निधन झालं. पालघरमधील चारोटी येथे झालेल्या अपघातातसायरस मिस्त्री यांनी आपला जीव गमावला. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाने उद्योग जगताला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्व होते. विनम्रता हा त्यांचा स्थायीभाव होता. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे फडणवीस म्हणाले.
कार अपघातात निधनमुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ मर्सिडीज गाडीच्या झालेल्या अपघातात टाटा सन्सचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एकूण दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास अहमदाबादवरून ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे. मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. त्यांची गाडी डिव्हायडला धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. सूर्या नदीवरील नवीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने धोकादायक डिव्हायडरला कार धडकली.