Cyclone Nisarga: नुकसानग्रस्तांना निकष बदलून दुपटीहून अधिक भरपाई देणार- बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 02:19 IST2020-06-14T02:19:26+5:302020-06-14T02:19:51+5:30
गुंठ्याच्या हिशेबाने मदत देण्याचा प्रस्ताव

Cyclone Nisarga: नुकसानग्रस्तांना निकष बदलून दुपटीहून अधिक भरपाई देणार- बाळासाहेब थोरात
- गणेश चोडणेकर
आगरदांडा/अलिबाग : राज्य सरकारने हेक्टरी ५० हजार आर्थिक मदत जाहीर केली आहे. मात्र कोकणातील परिस्थितीचा विचार करता ती गुंठ्याच्या हिशेबाने कशी देता येईल, याबाबत सोमवारी कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा करणार आहे. त्यामुळे मदतीपासून कोणीच वंचित राहणार नाही, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यामुळे येथील घरांचे, बागायतींचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी थोरात एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर आले होते. मुरूड तालुक्यातील काशीद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नुकसानग्रस्त जनतेला दिलासा देण्याचे काम शासनाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही करीत आहोत. शेतकऱ्यांनी धीर धरावा, विहित नियमांपेक्षा भरीव मदत शेतकरी बांधवांना कशी देता येईल यासाठी शासन कटिबद्ध आहे. देण्यात येणाºया नुकसानीच्या मदतीचे निकष बदलून दुपटीहून अधिक करण्यात आले आहेत. पूर्ण घराचे नुकसान झाले असेल तर दीड लाख रुपये आणि अंशत: झाले असेल तर पंधरा हजारांच्या आसपास मदत देण्यात येणार आहे. बागायतदारांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करण्यात येणार आहे, असे थोरात यांनी सांगितले.
घाटावर शेती ही एकरात असते तर कोकणात अर्धा गुंठा, एक गुंठा, पाच गुंठा अशी गुंठ्यात असल्याने देण्यात येणाºया मदतीचे निकष बदलणे गरजेचे आहे, असे येथील लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. यासाठी सोमवारी होणाºया कॅबिनेटच्या बैठकीत यावर चर्चा करून त्यातून काही तरी मार्ग काढण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हा पाहणी दौरा होत असून झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर केल्यानंतर यापूर्वीच्या विहित नियमांपेक्षा जास्त मदत शेतकरी बांधवांना मिळाली पाहिजे, याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा झालेली आहे. यासंदर्भात शासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय घोषित होईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या वेळी सांगितले. या वेळी त्यांच्या समवेत पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, माजी आमदार माणिकराव जगताप, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हलदे, पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी होते.
‘थोड्याफार कुरबुरी होणारच ’
एका राजकीय पक्षाचे सरकार असताना कुरबुरी होतात. आमचे तर तीन पक्षांचे सरकार आहे. थोड्याफार कुरबुरी तर होणारच, असे थोरात यांनी स्पष्ट करत विरोधकांना टोला लगावला. आमच्यातील विषय आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सोडवणार आहोत, असे सांगण्यासही थोरात विसरले नाहीत. प्रत्येक विभागाच्या मंत्र्यांना परिस्थिती जाणून घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्यांना नुकसानीचा अंदाज येणार नाही. त्यामुळे मंत्र्यांचे दौरे वाढल्याचे त्यांनी सांगून दौºयांचे समर्थन केले.