Cyclone Nisarga: 'मदतीच्या निकषांमध्ये बदल करा; मच्छीमार, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 06:47 IST2020-06-14T02:15:52+5:302020-06-14T06:47:36+5:30
चक्रीवादळाचा फटका; मुख्यमंत्र्यांशी भेटीत फडणवीस यांच्या मागण्या

Cyclone Nisarga: 'मदतीच्या निकषांमध्ये बदल करा; मच्छीमार, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या'
मुंबई : कोकणातील चक्रीवादळग्रस्त मासेमार आणि शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी द्या, मदतीच्या निकषांमध्ये बदल करा यासह १९ मागण्यांचे निवेदन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शनिवारी भेटून दिले. कोकणचा दोन दिवसांचा दौरा करून परतल्यानंतर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा केली.
हेक्टरी मदतीच्या निकषामध्ये बदल करण्यात यावा, मासेमारांसह शेतकºयांना कर्जमाफी देण्यात यावी, मासेमारांना डिझेलचे परतावे तत्काळ देण्यात यावे, वीज नसल्याने बँकांचे व्यवहार ठप्प असल्याने तातडीची मदत रोखीने देण्यात यावी आदी मागण्या फडणवीस यांनी केल्या. सरकारने मदतीची घोषणा केली पण ती अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेली नाही, बँका सुरू होत नाही तोपर्यंत रोखीने मदत करा, शेड/पत्रे इत्यादींचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो आहे. ते नागरिकांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावेत. रेशनचे धान्य, केरोसीन तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे. श्रीवर्धन येथे बस आगारात लोकांना कोंबून निवाºयामध्ये ठेवले आहे. निवाºयांची संख्या वाढवावी, वीज व्यवस्था सुरळीत करावी, कोकणातील शेतकऱ्यांचे चालू कर्ज माफ करण्यात यावे, तसेच नवीन दीर्घमुदतीचे कर्ज व्याज अनुदानासह द्यावे, छोट्या स्टॉलधारकांना आर्थिक मदत द्यावी, घर उभारणीसाठीच्या मदतीत वाढ करावी, पेण येथील गणेश मूर्तिकारांना मदत द्यावी, मासेमारांचीही जुनी कर्ज माफ करण्यात यावीत. त्यांना नव्याने भांडवल प्राप्त होईल, यासाठी मदत करावी आदी मागण्या फडणवीस यांनी केल्या. यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री आशीष शेलार, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, सुनील राणे आदी उपस्थित होते.