जगणं शिकविणारी करखेलची शाळा!
By Admin | Updated: February 8, 2015 01:27 IST2015-02-08T01:27:34+5:302015-02-08T01:27:34+5:30
‘तोतोचान्’ या जगप्रसिद्ध पुस्तकातील तोमाई शाळा... रवींद्रनाथ टागोरांची निसर्गशाळा.. ‘एक होता कार्व्हर’मधील शेती व प्रयोगशाळा..

जगणं शिकविणारी करखेलची शाळा!
चेतन धनुरे ल्ल उदगीर (जि. लातूर)
‘तोतोचान्’ या जगप्रसिद्ध पुस्तकातील तोमाई शाळा... रवींद्रनाथ टागोरांची निसर्गशाळा.. ‘एक होता कार्व्हर’मधील शेती व प्रयोगशाळा.. अशा वैविध्याने नटलेल्या शाळांशी नातं सांगणारी एक शाळा लातूर जिल्ह्यातही आहे, ती म्हणजे करखेलीची जिल्हा परिषदेची आठ शिक्षकी शाळा.
क्रमिक अभ्यासक्रमासोबतच जलपुनर्भरण, कचरा व्यवस्थापन, गांडूळ खत अन् बचतीसाठी बँक असे ४४ उपक्रम राबवून जबाबदार नागरिक घडवण्याचे कार्य ही शाळा करते आहे.
करखेली हे लातूर जिल्ह्यातील उदगीरजवळ वसलेले १३२० लोकसंख्येचे एक टुमदार गाव़ गावात पहिली ते आठवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे़ या शाळेतील शिक्षकांनी पुस्तकांच्या बाहेरचे जग विद्यार्थ्यांना दाखविण्याचा चंग बांधला आहे़ शाळेच्या आवारातच गांडूळ खत प्रकल्प तयार करून विद्यार्थ्यांना जैविक शेतीचे ज्ञान ेदेण्यात येते़ छतावरील पाण्याचे पुनर्भरण करून जलसंवर्धनाचे धडे दिले जातात़ रोपवाटिका विकसित करून त्यातील रोपांचे विद्यार्थ्यांना संवर्धनासाठी वाटप करण्यात येते़ कचरा व्यवस्थापनाचा छोटेखानी प्रकल्प तयार करून स्वच्छता राखण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात येते़
निसर्गाच्या सान्निध्यात अभ्यास करण्यासाठी शाळेतीलच वडाच्या झाडाखाली निसर्गशाळा तयार करून विद्यार्थ्यांतील अभ्यासाची गोडी वाढविली जात आहे़ मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक वाढविली़ स्वच्छता, जलसंवर्धन, आरोग्य अशा बाबींची मुले प्रार्थनेच्या वेळी शपथ घेतात अन् तसे वागतातही़ प्रामाणिक पेटी, टाकाऊपासून टिकाऊ, तक्रार निवारण आदी उपक्रम या शाळेने राबविले आहेत़
बँकेद्वारे स्वावलंबनाचे धडे़़़
विद्यार्थ्यांनी बँकेच्या कामकाजाचे अवलोकन करून शाळेतच अफलातून नावाची बँक उघडली आहे़ या बँकेत व्यवस्थापक, रोखपाल, लिपिकही विद्यार्थीच आहेत़ सभासदांना पासबुक देऊन बचत करण्यास प्रेरित केले जाते़ १ रुपयापासून ते १० रुपयांपर्यंत विद्यार्थी खात्यात रक्कम
जमा करतात़ गरजेवळी योग्य कारण देऊन त्यांना खात्यातील रक्कम काढताही येते़
आम्ही मुलांना पुस्तकं शिकवित होतो, पण ती त्यांना जगणं शिकवित नव्हती. आम्ही पुढाकार घेतला आणि ४४ उपक्रमांद्वारे मुलांना जगणं आणि जबाबदारी दोन्ही गोष्टी सहजपणे शिकवू शकलो.
- भरत निलेवाड, मुख्याध्यापक, जि. प. शाळा करखेली.
या शाळेने पारंपरिक शिक्का पुसलाच शिवाय झाडाखाली वर्ग भरून, रोपवाटिका चालवून विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध जैविक शेती मातीचे शिक्षण देत ‘कार्व्हर’च्या शेतीशाळेशी शिक्षण अशी सांगड घालून नवा विचार दिला आहे.