पीक विम्याचे पैसे शेतक-यांच्या कर्ज खात्यात !
By Admin | Updated: July 21, 2016 23:23 IST2016-07-21T23:23:39+5:302016-07-21T23:23:39+5:30
कर्जवसुली न करण्याचे आदेश असतानाही शेतकरी पीक विम्यापासून वंचित.

पीक विम्याचे पैसे शेतक-यांच्या कर्ज खात्यात !
विवेक चांदूरकर / बुलडाणा
राज्यात दुष्काळ जाहीर झालेल्या जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची कर्ज वसुली करू नये असे आदेश शासनाने दिले आहेत; मात्र त्यानंतरही कर्ज पुनर्गठन करून नवीन कर्ज घेतलेल्या शेतकर्यांना मिळत असलेला पीकविमा हा शेतकर्यांच्या कर्ज खात्यात जमा होत असून, शेतकर्यांकडून अनपेक्षितरीत्या वसुलीच करण्यात येत आहे.
विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यावर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या भागातील शेतकर्यांकडून कोणत्याही प्रकारची कर्ज वुसली करू नये असे आदेश दिले आहेत. गत पंधरा दिवसांपासून राज्यस्तरीय बँकर्स समिती व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शेतकर्यांना २0१५ साली काढलेला पीक विमा देण्यात येत आहे. ज्या शेतकर्यांनी पहिल्यांदाच कर्ज घेतले अशा शेतकर्यांच्या बचत खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येत आहे.
ज्या शेतकर्यांनी गतवर्षीच्या कर्जाचे नूतनीकरण केले, अशा शेतकर्यांच्या बचत खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात होत आहे. तसेच थकीत कर्ज असलेल्या नवीन कर्ज न मिळालेल्या शेतकर्यांच्याही बचत खात्यात ही रक्कम जमा करण्यात येणार आहे; मात्र ज्या शेतकर्यांनी गतवर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन केले व यावर्षी नवीन पीक कर्ज घेतले, अशा शेतकर्यांच्या कर्ज खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार येत असून सदर रक्कम शेतकर्याला मिळणार नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
बँकेकडून घेतलेले कर्ज शेतकरी उत्पन्नातून फेडू शकतात. त्यकरिता विम्याचे पैसे वळते करणे चुकीचे असल्याचा आरोप काही शेतकर्यांनी केला आहे.
***
शेतकर्यांवर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे राज्यस्तरीय बँकर्स समिती व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार यावर्षी मागील वर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन करून नवीन कर्ज घेणार्या शेतकर्यांच्या कर्जखात्यात विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे. अन्य सर्व शेतकर्यांच्या बचत खात्यात विम्याची रक्कम टाकण्यात येणार आहे.
- सुभाष बोंदाडे
व्यवस्थापकीय संचालक, नाबार्ड, बुलडाणा.