नागपुरातील गुन्हेगारी वाढली
By Admin | Updated: July 3, 2014 01:05 IST2014-07-03T01:05:07+5:302014-07-03T01:05:07+5:30
होय, नागपुरातील गुन्हेगारी वाढली, ही प्रांजळ कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) संजीव दयाल यांनी आज येथे पत्रकारांसोबत बोलताना दिली. सोबतच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी

नागपुरातील गुन्हेगारी वाढली
पोलीस महासंचालकांची स्पष्टोक्ती : आळा घालण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न
नागपूर : होय, नागपुरातील गुन्हेगारी वाढली, ही प्रांजळ कबुली राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) संजीव दयाल यांनी आज येथे पत्रकारांसोबत बोलताना दिली. सोबतच वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. दयाल आज सकाळीच नागपुरात आले. येथील पोलीस जिमखान्यात त्यांनी ठाणेदार, एसीपी,डीसीपींसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलले. पहिल्याच प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी नागपुरातील क्राईम रेट वाढल्याचे मान्य केले. तक्रारी दाखल करून घेण्यास टाळाटाळ करायची आणि गुन्हे (क्राईम रेट) कमी असल्याचे दाखवायचे, असा प्रकार नागपूर पोलिसांकडून होत नाही. त्यामुळे गुन्हेगारी वाढल्याचे जाणवते. मात्र, त्यामागची अनेक कारणे आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी पोलीस प्रयत्नशिल असल्याचेही दयाल यांनी सांगितले.
आर्थिक गुन्हे वाढले
आर्थिक फसवणुकीची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले असता त्यांनी या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया थोडीशी वेळखाऊ असल्याचे सांगतानाच पुराव्याची साखळी जोडण्यात फार वेळ जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, नागरिकांना गंडविणाऱ्यांना पोलीस सोडणार नाहीत, असेही दयाल म्हणाले. वाढत्या सायबर क्राईम आणि पोलीस कस्टडीतील मृत्यू तसेच सीसीटीव्हीसंदर्भात त्यांनी वेळकाढू उत्तर दिले. पोलिसांच्या रखडलेल्या बदल्यांबाबत उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. दया नायक यांची नागपूर ग्रामीणमध्ये बदली होऊन चार महिने झाले. मात्र, ते अद्याप येथे रुजू झाला नाही. या संदर्भातही दयाल यांनी गोलमोल उत्तर दिले. नागपुरातील प्रस्तावित नवीन पोलीस ठाण्याला जागा मिळताच ते सुरू करण्यात येतील, असे दयाल म्हणाले. नागपूर मध्यवर्ती कारागृहात सर्रास मोबाईल, अंमली पदार्थ वापरले जात असून, आतमध्ये असलेले गुंड तेथूनच आपल्या साथीदारांकडून खंडणी वसूल करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले असता, कारागृह प्रशासन ही स्वतंत्र यंत्रणा आहे, ती आपल्या अखत्यारित नाही. त्यामुळे त्या संदर्भात आपण काही बोलू शकणार नाही, असे दयाल म्हणाले. यावेळी पोलीस आयुक्त कौशलकिशोर पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना, अतिरिक्त आयुक्त दीपक पांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नक्षलवादाविरोधात केंद्राचे बळ
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी १० राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची बैठक घेतली. त्यात त्यांनी नक्षलवाद मोडून काढण्यासाठी सर्व साधन-सुविधा उपलब्ध करून देत पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे दयाल यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा भक्कम पुरावे मिळाले तेव्हा तेव्हा नक्षलवाद्यांची फ्रंट आॅर्गनायझेशन चालविणारे प्रो. साईबाबा, अँजेला आणि त्यांच्यासारख्या अनेकांना पोलिसांनी अटक केल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.