महापालिकेच्या ठेकेदारावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2016 05:24 IST2016-08-05T05:24:09+5:302016-08-05T05:24:09+5:30
पे अॅण्ड पार्कच्या नावाखाली बनावट पावत्या देत चालकांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महापालिकेच्या ठेकेदारावर गुन्हा
मुंबई : पे अॅण्ड पार्कच्या नावाखाली बनावट पावत्या देत चालकांकडून जास्त पैसे उकळणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आर. टी. कॉर्पोरेशन या कंपनीकडे हे कंत्राट देण्यात आले होते. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी कंपनीच्या दोन कामगारांना अटक केली आहे.
हुतात्मा चौक परिसरात पे अॅण्ड पार्कची जबाबदारी पालिकेने आर. टी. कॉर्पोरेशनकडे सोपवली होती. याच कामाअंतर्गत येथील कर्मचाऱ्यांनी बनावट पावत्या बनवून चालकांकडून जास्तीचे पैसे उकळण्यास सुरुवात केली. यामध्ये २० रुपयांऐवजी येथे गाडी पार्क करणाऱ्यांकडून तासाचे ८० रुपये घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. याबाबत एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच तेथील पोलिसांनी अधिक तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळाहून पोलिसांनी बनावट पावती पुस्तक ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती एमआरए मार्ग पोलिसांनी दिली. या प्रकरणी दोघांना अटक करून कंत्राट कंपनीच्या ठेकेदाराला चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)