सकारात्मक वातावरण निर्मिती करा

By Admin | Updated: July 20, 2014 01:13 IST2014-07-20T01:13:55+5:302014-07-20T01:13:55+5:30

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करावे व जनप्रतिनिधींनी जनतेच्या स्थानिक

Create a positive environment | सकारात्मक वातावरण निर्मिती करा

सकारात्मक वातावरण निर्मिती करा

सरसंघचालकांचा संदेश : संघ-भाजपाचे ‘मिशन विधानसभा’ सुरू
नागपूर : राज्यातील आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्न करावे व जनप्रतिनिधींनी जनतेच्या स्थानिक समस्या निवारणावर भर द्यावा असा संदेश सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी दिला आहे.
संघाचे प्रांत प्रचारक, संघ परिवारातील संघटना व राज्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शनिवारपासून नागपुरात २ दिवसीय समन्वय बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीची रुपरेषा पाहता लोकसभा निवडणुकांप्रमाणेच संघकारणाचा ‘फॉर्म्युला’ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांमध्येदेखील वापरल्या जाण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
रेशीमबाग येथील स्मृतीमंदीर परिसरात सुरू असलेल्या या समन्वय बैठकीत संघाच्या निरनिराळ्या प्रांत प्रचारकांनी तसेच संघ परिवारातील संघटनांनी गेल्या काही काळातील राज्यातील निरनिराळ््या भागातील कामाची रूपरेषा सरसंघचालकांसमोर मांडली. त्याचप्रमाणे विभागनिहाय कुठल्या समस्या प्रचाराचा मुद्दा म्हणून उचलता येतील यावरदेखील चर्चा झाली.
त्यात विदर्भातील नक्षलवादाच, मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रातील पाणीटंचाई, राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, ठिकठिकाणी दलित व वंचितांवरील अन्याय या समस्यांचा उल्लेख झाला. या समस्यांच्या निवारणासाठी प्रयत्न करुन जनतेपर्यंत पोहोचण्यावर जनप्रतिनिधींनी जोर दिला पाहिजे. दुसरीकडे संघ स्वयंसेवकांनी थेट भाजपाचे नाव न घेता सकारात्मक वातावरणनिर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असेदेखील सांगण्यात आले. लोकसभा निवडणूकांदरम्यान संघ स्वयंसेवकांनी काही राज्यांत घरोघरी जाऊन संपर्क केला होता.
या महिन्याच्या अखेरीस स्वयंसेवक व प्रचारकांच्या बैठकीत विधानसभा निवडणूकांसंदर्भातील योजनांची माहिती देण्यात येणार असल्याचेदेखील सूत्रांनी सांगितले. सोबतच समोरील आव्हाने लक्षात घेता संघ परिवारात जास्तीत जास्त प्रशिक्षित व कुशल कार्यकर्ते घडावे यासाठी प्रयत्न करण्यात यावा असा सूरदेखील या बैठकीत दिसून आला.
नेत्यांचा ‘दक्ष’ पवित्रा
‘लोकमत’ प्रतिनिधीने बैठकस्थळी जाऊन यासंदर्भात माहिती घेतली असता गोवा, गुजरात सोबतच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील प्रांत प्रचारकांची उपस्थिती दिसून आली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा पालवे-मुंडे हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते.या बैठकीसंदर्भात संघाच्या पदाधिकाऱ्यांशी प्रतिक्रियेसाठी संपर्क करण्यात आला. परंतु कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील ही ठराविक काळाने घेण्यात आलेली बैठक होती, असे सांगून ‘मौन’ बाळगणेच पसंत केले.

Web Title: Create a positive environment