Maharashtra Governor Resigned: भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवडून आलेल्या सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळेच आता, राष्ट्रपतींनी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. आचार्य देवव्रत गुजरातसह महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचाही कार्यभार सांभाळतील.
राष्ट्रपती भवनाने दिलेल्या माहितीनुसार, सीपी राधाकृष्णन उद्या, म्हणजेच १२ सप्टेंबर २०२५ रोजी देशाचे १७ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती आणि सर्व मंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडेल.
१० सप्टेंबर रोजी झालेली निवडणूक
मंगळवार (१० सप्टेंबर) रोजी नवी दिल्लीतील संसद भवनात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी मतदान झाले. यामध्ये एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन विजयी झाले. निवडणुकीत ७६८ खासदारांनी मतदान केले, तर १३ सदस्य अनुपस्थित होते. सीपी राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. अशाप्रकारे राधाकृष्णन यांनी रेड्डींचा १५२ मतांनी पराभव केला.
सीपी राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास
सीपी राधाकृष्णन यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. राज्यपाल असताना त्यांनी उच्च शिक्षण आणि ग्रामीण विकासाच्या गुणवत्तेवर भर दिला. महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी त्यांनी झारखंड आणि तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारीही स्वीकारली. १९९८ मध्ये ते पहिल्यांदा कोइम्बतूर येथून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. १९९९ मध्ये ते पुन्हा खासदार झाले. संघाच्या मुशीत तयार झालेल्या राधाकृष्णन यांनी भाजपमध्ये अनेक पदे भूषवली आहेत.