४० हजार पोलिसांचा मोजणार भावनांक
By Admin | Updated: May 6, 2015 03:51 IST2015-05-06T03:51:23+5:302015-05-06T03:51:40+5:30
वाकोला गोळीबारासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस दलातल्या ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भावनांक किंवा भावनिक परिपक्वता तपासली जाणार आहे.

४० हजार पोलिसांचा मोजणार भावनांक
जयेश शिरसाट, मुंबई
वाकोला गोळीबारासारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलीस दलातल्या ४० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा भावनांक किंवा भावनिक परिपक्वता तपासली जाणार आहे. त्यानंतर गरजेनुसार मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशनही लाभणार आहे. या तपासणीत आयुक्त राकेश मारिया यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही भावनांकाचे विश्लेषण होणार आहे.
भावनांक तपासण्याची ही कवायत सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. भारती यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार आयुक्तांपासून शेवटच्या पोलीस शिपायापर्यंत सर्वांकडून एक फॉर्म भरून घेतला जाईल. या फॉर्ममध्ये मानसोपचार तज्ज्ञांनी काढलेले प्रश्न असतील. या प्रश्नांच्या उत्तरांवरून प्रत्येकाचा भावनांक मोजला जाईल. त्यानंतर गरजेनुसार मानसोपचार तज्ज्ञ प्रत्येकाचे समुपदेशन करतील. तसेच भावनांवर नियंत्रण (पान ६ वर)
मिळविण्यासाठीचे उपाय सुचवतील.
मानसोपचारतज्ज्ञांच्या याच समितीकडून पोलिसांचा भावनांक मोजण्यासाठी आवश्यक असलेले प्रश्न ठरविणार आहे. त्यातून एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याच्या भावनांचा उद्रेक होतो का, त्याला भावना आवरता येत नाहीत का, भावनेच्या भरात तो हिंसक होतो आणि पुढलामागचा विचार न करता तो कृती करतो का, हे मानसोपचार तज्ज्ञ जाणून घेणार आहेत.
मारिया यांनी पोलीस आयुक्तपदाचा भार स्वीकारल्यानंतर त्यांनी अशाप्रकारे पोलिसांचा भावनांक मोजता येईल, असे सांगितले होते. त्यांची ती सूचना योजनेचे स्वरूप घेत असतानाच वाकोला प्रकरण घडल्याने या योजनेची अमलबजावणी तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
दरम्यान, मुंबई विद्यापिठाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. गौतम गवळी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पोलिसांच्या भावनांकासोबत भावनिक परिपक्वताही तपासणे आवश्यक आहे. दुसऱ्याने व्यक्त केलेल्या भावना समजून घेणे आणि स्वत:च्या भावना दुसऱ्याला समजतील अशा व्यक्त करणे याला इमोशनल इंटेलीजन्स किंवा भावनिक परिपक्वता म्हणतात. पोलिसांना कॉन्फ्लीक्ट मॅनेजमेन्टचे (संघर्ष परिस्थितीतील व्यवस्थापन) धडे देणे आवश्यक असल्याचे डॉ. गवळी सांगतात. पोलिसांच्या आयुष्यात दररोज मानसिक संघर्षाची परिस्थिती उद्भवते. शिवाय पोलीस सशस्त्र असतात. त्यामुळे भावनिक संतुलन बिघडल्यास वाकोला गोळीबारासारखे प्रकार घडू शकतात.
उपाययोजना करण्यावर भर
शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्य राखणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस दलात भावनांक मोजून तो नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. - देवेन भारती,
सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था)