Coronavirus: ...तर राज्यातील पालिका निवडणुका पुढे ढकलणार, राज्य सरकारने दिले संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 21:33 IST2022-06-03T21:32:22+5:302022-06-03T21:33:06+5:30
Election In Maharashtra: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढच्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीबाबत अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Coronavirus: ...तर राज्यातील पालिका निवडणुका पुढे ढकलणार, राज्य सरकारने दिले संकेत
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यासह मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा अचानक वाढू लागाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अलर्ट झालेल्या केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. राज्यात आजही एक हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढच्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीबाबत अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाचे रुग्ण आणखी वाढल्यास या निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे करणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकारची चिंता वाढवत आहे. त्यामुळे राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीवर अनिश्चिततेचं सावट आलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, पुढे सांगितले की, पुढचे आठ ते १० दिवस महत्त्वाचे आहेत. त्यावरूनच पुढचा निर्णय घेतला जाईल. या निवडणुकांची घोषणा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला अजून अवधी आहे. मात्र काही परिस्थिती ओढवली तर निवडणूक आयोगाला निवडणूक पुढे ढकलण्यासाठी विनंती करावी लागेल. तसेच निवडणुका टाळता येतील का, याबाबतही चाचपणी सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. आज राज्यात ११३४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच मुंबईमध्येही गेल्या काही दिवसांपासून ५०० च्या वर कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.