Coronavirus : खबरदारी गरजेची! त्रिसूत्रीवर भर, टास्क फोर्सचे राज्यभरात निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 07:22 IST2022-12-23T07:22:10+5:302022-12-23T07:22:37+5:30
चीन, जपान, अमेरिका, कोरिया यांसारख्या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

Coronavirus : खबरदारी गरजेची! त्रिसूत्रीवर भर, टास्क फोर्सचे राज्यभरात निर्देश
मुंबई : चीन, जपान, अमेरिका, कोरिया यांसारख्या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी टास्क फोर्ससह बैठक घेत सर्व जिल्ह्यांना संसर्ग नियंत्रणासाठी निर्देश दिले आहेत. यात प्रामुख्याने टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रींवर भर देण्यास सांगितले आहे.
कोरोना रुग्णांना शोध, निदान, उपचारांसह लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. प्रत्येक जिल्हा / महापालिकेने चाचण्यांची संख्या वाढवावी. चाचण्यांमध्येही आरटीपीसीआरचे प्रमाण वाढवावे, असेही टास्क फोर्सने सूचित केले आहे. प्रत्येक आरटीपीसीआर बाधित नमुना (सीटी व्हॅल्यू ३० पेक्षा कमी) जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवावा. याकरिता राज्यात सात प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत एनआयव्ही पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. वर्षा पोतदार यांनी बैठकीस संबोधित केले. सद्यस्थितीत केंद्र सरकारच्या समन्वयाने आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या स्क्रीनिंगबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी सांगितले.
चीनमधील नवा व्हेरिएंट देशातही
चीनमधील बीएफ ७ हा व्हेरिएंट पूर्वी भारतात आढळलेला आहे. त्यामुळे या व्हेरिएंटची भीती बाळगण्याची गरज नसली तरी आवश्यक दक्षता घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नवीन रुग्णसंख्या ३० टक्क्यांनी कमी
राज्यात कोविडचे प्रमाण कमी होत असून, या आठवड्यात मागील आठवड्याच्या तुलनेत नवीन रुग्णसंख्या ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. तसेच, प्रयोगशाळा पाॅझिटिव्हिटी रेट ०.२९ टक्के एवढा कमी झालेला आहे.
‘या’ जिल्ह्यांत पाॅझिटिव्हिटी रेट अधिक
राज्यात अकोला, पुणे, अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यांचा पाॅझिटिव्हिटी रेट एकपेक्षा अधिक आहे.
राज्यात मागील आठवड्यात
१६ कोविड रुग्ण रुग्णालयात भरती झाले. त्यापैकी ८ रुग्णांना अतिदक्षता विभागाची गरज
भासली आहे.
राज्यात सध्या १३५ कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत.