CoronaVirus रुग्णांची संख्या वाढतेय; ... तर लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल - टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 06:10 AM2020-04-05T06:10:02+5:302020-04-05T06:11:09+5:30

राज्यात ३८ हजार ३९८ जण होम क्वारंटाइन

CoronaVirus patients is increasing; will have to increase lockdown says rajesh tope hrb | CoronaVirus रुग्णांची संख्या वाढतेय; ... तर लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल - टोपे

CoronaVirus रुग्णांची संख्या वाढतेय; ... तर लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल - टोपे

Next

- अतुल कुलकर्णी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोरोनाच्या शक्यतेमुळे होम क्वारंटाइन करण्यात आलेल्यांची संख्या आता ३८,३९८ वर गेली आहे, तर विविध दवाखान्यांमध्ये देखील ३०७२ लोक क्वारंटाइन केले गेले आहेत, असे सांगून आरोग्य मंत्री राजेश टोपे लोकमतशी बोलताना म्हणाले, बाधित किंवा संशयीय दोन्ही रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. वारंवार सांगूनही लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत, विनाकारण फिरण्यात त्यांना कसला मोठेपणा वाटतो माहिती नाही, पण असेच चालू राहिले तर नाईलाजाने काही शहरांमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागेल.


त्यांच्याशी झालेली ही बातचित :
दिल्लीच्या मर्काझमधून राज्यात रुग्णांची संख्या वाढली, असे सांगितले जाते. ते खरे काय आहे?
आपल्याला केंद्र सरकारकडून १,२२५ जणांची यादी आली. त्यापैकी १,०३३ लोकांना आपण शोधून काढले, त्यांच्या तपासण्या केल्या. त्यापैकी ७३८ लोकांना आपण क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. त्यापैकी ५ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत.
राज्यात मास्क आणि पीपीई किटची सतत मागणी होत आहे. डॉक्टर्स, नर्सेस यांना मास्क मिळत नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यावर सरकार काय करत आहे?
आपल्याकडे सध्या २१ लाख ७० हजार तीन पदरी मास्क आहेत. ते राज्यभर पाठवण्यातही आले आहेत. ज्या ठिकाणी थेट कोरोनाचे बाधित रुग्ण ठेवले आहेत तेथेच एन ९५ मास्कची गरज पडते. एकट्या आरोग्य विभागाकडे एन-९५ मास्क आणि २५,६०० पीपीई किट देखील आहेत. आणखी आॅर्डर दिलेल्या आहेत. त्याची फार गरज पडत नसल्याने या गोष्टी कोणी फार तयार करत नव्हते, पण आता आपण त्याच्या उत्पादनाची सोय राज्यातच केली आहे.


व्हेंटिलेटर आपल्याकडे पुरेशे नाहीत असे बोलले जात आहे. त्याविषयी काय सांगाल?
हा विषय नीट समजून घेण्याचा आहे. आपण ११,५९२ आयसोलेशन बेड फक्त कोरोना रुग्णांसाठी तयार ठेवले आहेत. त्यापैकी फक्त ५३७ बेड वापरात आहेत. आयसीयूचे २,४१५ बेड राज्यात आहेत. त्यापैकी फक्त चार ते पाच बेड वापरात आहेत. आपल्याकडे एकट्या आरोग्य विभागाचे २,८०० व्हेंटिलेटर आहेत. एकही रुग्ण आज व्हेंटिलेटरवर नाही. शिवाय महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत राज्यात जवळपास १,००० हॉस्पिटलची नोंदणी झालेली आहे, त्यांच्याकडे सुमारे २००० व्हेंटिलेटर्स आहेत, ज्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे वस्तूस्थिती समजून न घेता भीती निर्माण करण्याचे काम कोणी करू नये.


मुंबई व पुण्यात रुग्ण कमी होताना दिसत नाही, त्याचे काय?
मुंबईत शुक्रवारी ६७ रुग्ण आढळले, आज ती संख्या ५० पर्यंत आहे. म्हणजे कमी आहे. आपण ज्या भागात ३ पेक्षा जास्त कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत, ते भाग सील केले आहेत. असे २१० विभाग एकट्या मुंबईत आहेत. त्यावर कठोर नजर ठेवली जात आहे. संख्या वाढू द्यायची नसेल तर जनतेने ही सहकार्य केले पाहिजे, ते मिळणार नसेल तर लॉक डाऊन वाढवणे व तो आणखी कठोर करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
समूह तपासणीची वाढ करण्याची गरज आहे पण काही भागात डॉक्टरांना जाऊ दिले जात नाही, अशा तक्रारींवर काय करणार?
आपण २,४५५ पथके क्लस्टर कन्टेन्मेंटसाठी तयार केली आहेत. आत्तापर्यंत ९.२५ लाख लोकांची तपासणी पूर्ण झाली आहे. मात्र जर लोक सहकार्य करणार नसतील तर महामारीच्या कायद्यानुसार नाईलाजाने लोकांवर कठोर कारवाई करावी लागेल.

आजीबाईचा बटवा आठवा - टोपे
मी आरोग्य मंत्री म्हणून जबाबदारीने काही गोष्टी सांगतो. त्यात आपण रोज कोमट पाणी प्या, प्राणायाम, योगा व श्वासाशी संबंधित आसने करा. हळद, जिरे, लसूण, धने यांचा वापर खाण्यात वाढवा. हर्बल टी ज्यात तुळशी, दालचिनी व आले आहे, ती वापरा. व्हिटामिन सी साठी आवळा, लिंबू, संत्रे रोज खा. आपल्या आजीकडून आपल्याला हे तिच्या बटव्यातून मिळालेले आहे तेच आता करायचे आहे असेही राजेश टोपे म्हणाले.
भाजी बाजार : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागपुरात मनपा प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी मैदानात भाजीबाजाराची व्यवस्था केली. परंतु, ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या नियमांचे उल्लंघन करीत बाजारामध्ये प्रचंड गर्दी होत आहे.

Web Title: CoronaVirus patients is increasing; will have to increase lockdown says rajesh tope hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.