CoronaVirus News: राज्यातील रुग्णवाढीनंतर सीमेवर गुजरातचे निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 04:43 AM2021-04-05T04:43:42+5:302021-04-05T04:44:03+5:30

भिलाड नाक्यावर तपासणी केंद्र

CoronaVirus News: Gujarat restrictions on border after outbreak of disease in the state | CoronaVirus News: राज्यातील रुग्णवाढीनंतर सीमेवर गुजरातचे निर्बंध

CoronaVirus News: राज्यातील रुग्णवाढीनंतर सीमेवर गुजरातचे निर्बंध

Next

- सुरेश काटे

तलासरी : महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढताच शेजारील गुजरात राज्याने महाराष्ट्रातून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध घातले. भिलाड नाक्यावर तपासणी केंद्र सुरू केले आहे, पण आपल्या आरोग्य खात्याला अजून जाग आलेली नाही. त्यामुळे गुजरात राज्यातून महाराष्ट्रात प्रवासी बिनधास्त ये-जा करीत आहेत. ना त्यांच्या तपासण्या, ना त्यांच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. याचा परिणाम रुग्णवाढीवर होत आहे. दरम्यान, गेल्या दहा दिवसांत तलासरी तालुक्यात ८२ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे.

तलासरी तालुक्यातून मोठ्या संख्येने कामगार गुजरात राज्यात कामाला जात असतात. भाडे परवडत नसल्याने एका गाडीत १५ ते २० कामगार भरून नेले जातात आणि परत येतात. यामुळे आवश्यक सोशल डिस्टन्सिंग पाळला जात नाही. दुसरीकडे गेल्या वर्षी कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असताना तलासरीवासीयांना दिलासा मिळाला होता. मात्र आता गेल्या पंधरा दिवसात तलासरीत कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत आहेत. ही वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता भीतीचे वातावरण पसरले आहे. तलासरी नगरपंचायत हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढू लागताच नगरपंचायतीने बंद पाळून व्यापाऱ्यांची तपासणी बंधनकारक केली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी रांगा लावून कोरोना चाचणी करून घेतली. यात पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांची दुकाने सील करण्यात आली. तलासरीत वाढलेल्या या रुग्णसंख्येला नागरिकांबरोबर यंत्रणाही तितकीच जबाबदार आहे. मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, स्वच्छता राखणे या नियमांचे पालन होणे गरजेचे असताना ना व्यापाऱ्यांकडून, ना नागरिकांमधून नियम पाळले गेले.

लसीकरणासाठी फेऱ्या
तलासरीत रुग्णवाढ होत असताना मात्र नगरपंचायतीची औषध फवारणी बंद आहे. आरोग्य यंत्रणेकडून कोरोना चाचणी केंद्र वाढविणे गरजेचे असताना त्यात वाढ होत नाही. तलासरीतील व्यापारी तपासणीसाठी वारंवार फेऱ्या मारत आहेत, पण त्यांचा नंबर येत नाही. सुट्टीच्या दिवशीही तपासणी केंद्र सुरू ठेवण्याची मागणी होत आहे.

Web Title: CoronaVirus News: Gujarat restrictions on border after outbreak of disease in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.