CoronaVirus News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; मास्कच्या किमतीत मोठी घट; जाणून घ्या नव्या किमती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 07:28 IST2020-10-08T04:43:21+5:302020-10-08T07:28:49+5:30
CoronaVirus Mask Price in Maharashtra: सरकारने काढला आदेश, परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होणार मास्क

CoronaVirus News: राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; मास्कच्या किमतीत मोठी घट; जाणून घ्या नव्या किमती
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किमतींवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीच्या शिफारशीनुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या किमतीत मास्क उपलब्ध होणार असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. यासाठी ‘लोकमत’ने मोहीम हाती घेतली होती. मास्क खरेदीतील घोटाळ्याचा पर्दाफाशही केला होता. त्यानंतर सरकारने समिती स्थापन केली होती.
आता एन-९५ मास्क त्याच्या प्रकारानुसार साधारण १९ ते ५० रुपयांपर्यंत उपलब्ध होईल तर दुहेरी आणि तिहेरी पदरांचे मास्क अवघ्या तीन ते चार रुपयांना मिळतील. समितीने निर्धारित केलेल्या किमतींवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शासन मान्यतेनंतर सुधारित दरानुसार मास्क विक्री करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रात्री उशिरा येथे दिली.
टोपे म्हणाले, कोरोना साथीच्या आधी एन ९५ मास्क ४० रुपयांना विकला जायचा. मार्चमध्ये हाच मास्क ४० वरून १७५ रुपये एवढ्या चढ्या दराने विकला गेला. काही एन ९५ मास्क तर २५० रुपयांपर्यंत विक्री झाले आहेत. तिहेरी आणि दुहेरी पदर असलेले मास्क ८ ते १० रुपयांवरून १६ रुपयांना विक्री झाले असून त्यांच्या किमतींत १६० टक्केपेक्षा जास्त वाढ झाल्याचे समितीच्या निदर्शनास आले आहे. कच्चा माल, उत्पादन किंमत, उत्पादक, वितरक यांचा नफा या सर्व बाबींचा अभ्यास करून समितीने किमती निश्चित केल्या आहेत.
मास्क किफायतशीर किमतींत उपलब्ध झाल्यावर सामान्यांना दिलासा मिळणार असून योग्य निकषानुसार त्याचे उत्पादनदेखील होईल आणि योग्य दरात त्यांचा पुरवठाही होईल. रुग्णालयांचा रुग्णसेवा खर्चदेखील त्यामुळे कमी होईल, असा दावादेखील त्यांनी केला.
मास्कचे दर नियंत्रित असावेत यासाठी आरोग्यमंत्री टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती.