CoronaVirus : बाप्पा पावला! 'या' जिल्ह्यात पहिले दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 04:39 PM2020-04-18T16:39:37+5:302020-04-18T16:53:19+5:30

या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

CoronaVirus : Good news! The first two patients in kolhapur become corona free; Discharge from hospital vrd | CoronaVirus : बाप्पा पावला! 'या' जिल्ह्यात पहिले दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

CoronaVirus : बाप्पा पावला! 'या' जिल्ह्यात पहिले दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त; टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात डिस्चार्ज

Next

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पुण्याहून आलेला पहिला कोरोना रुग्ण आणि त्याच्यामुळे संसर्ग झालेली त्याची बहीण अशा दोघांचेही कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले. अशा दोघांना आज येथील अथायू रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि तुळशीचे रोप देऊन घरी सोडण्यात आले.

कोल्हापुरातील भक्तिपूजानगरमध्ये पुण्याहून आलेल्या तरुणाला 26 मार्च रोजी कोरोना झाल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्याच्या बहिणीचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दोघांनाही सरनोबतवाडी येथील अथायू रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. या ठिकाणी अथायू रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सतीश पुराणिक, नर्सिंगच्या अधीक्षक शीतल राणे, उप व्यवस्थापक राहुल खोत, कॅज्युलिटी इन्चार्ज विजय महापुरे हे या दोघांवर उपचार करत होते. 

आवश्यक ती रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे, काही पूरक जीवनसत्त्वे, जोडीला समुपदेशन आणि आयुर्वेदिकतेचीही पद्धती या 23 दिवसांत उपचारात वापरण्यात आल्याची माहिती डॉ. पुराणिक यांनी दिली. मुख्य रुग्णालयापासून बाजूला असणाऱ्या इमारतीत कोव्हिड -19चा विलगीकरण कक्ष करण्यात आलेला होता. यामध्ये जीवनरक्षक यंत्रणेसह सर्व आपत्कालीन सुविधा तैनात ठेवण्यात आली होती. 14 दिवसांनंतर या दोघांचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने ते कोरोनामुक्त झाले. आज कोव्हिड-19 या विलगीकरण कक्षापासून दोन्ही बाजूला रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. दोन्ही बाजूला फुगे लावण्यात आले होते. रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी टाळ्यांच्या गजरात या दोघांना निरोप दिला. रुग्णालयाच्या लॉबीत असणाऱ्या श्रीगणेशाची त्या दोघांनी आरती करून दर्शन घेतले. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर  फुगे फोडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी या दोघांनाही तुळशीचे रोप आणि मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्‍य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, रुग्णालयाचे अध्यक्ष अनंत सरनाईक उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाकडून अथायू रुग्णालयाचे आभार- डॉ. कलशेट्टी
जिल्ह्यामध्ये सापडलेल्या पहिल्या कोरोनाबाधित आणि त्याच्यामुळे संसर्ग झालेल्या अशा दोन्ही रुग्णांवर अथायू रुग्णालयाने गेल्या 23 दिवसांत अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार केले. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या बरोबरीने अथायू रुग्णालयाने कोरोना विरुद्धच्या या लढाईत सहभाग घेतला, असे सांगून महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या रुग्णालयाच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार मानले. 

Web Title: CoronaVirus : Good news! The first two patients in kolhapur become corona free; Discharge from hospital vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.