CoronaVirus News: ठाकरे सरकारनं लपवली आकडेवारी?; कोरोना मृतांची संख्या अचानक १३२८ नं वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 05:56 AM2020-06-17T05:56:41+5:302020-06-17T06:50:17+5:30

कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली जात असल्याचा आपण केलेला आरोप खरा ठरला; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

CoronaVirus Corona death toll suddenly increases by 1328 | CoronaVirus News: ठाकरे सरकारनं लपवली आकडेवारी?; कोरोना मृतांची संख्या अचानक १३२८ नं वाढली

CoronaVirus News: ठाकरे सरकारनं लपवली आकडेवारी?; कोरोना मृतांची संख्या अचानक १३२८ नं वाढली

Next

मुंबई : राज्यात कोरोनाने १५ जूनपर्यंत ४१२८ मृत्यू झालेले असताना राज्य सरकारने मंगळवारी केलेल्या स्पष्टीकरणानंतर प्रत्यक्षात आणखी १३२८ मृत्यू झाले असल्याचे समोर आले. त्यामुळे कालपर्यंत मृतांचा आकडा ५४५६ झाला आहे. त्यानंतर, कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली जात असल्याचा आपण केलेला आरोप खरा ठरला आहे, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितले की, राज्य सरकारने फेरतपासणी केली असता मुंबई महापालिका क्षेत्रात आणखी ८६२ मृत्यू, तर राज्यात आणखी ४६६ मृत्यू आढळले. या सर्व प्रकरणांत मृत्युसमयी कोविड अहवाल पॉझिटीव्ह आला होता व या सर्व प्रकरणांची नोंद डेथ इन कोविड पॉझिटीव्ह म्हणून घेण्यात आली आहे.

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नोंदी कमी संख्येने दाखविण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना मेहता यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर तसेच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या (एनसीडीसी) मार्गदर्शक तत्वांनुसार कोरोनाबधित मृत्यू प्रकरणांची तपासणी करणे बंधनकारक आहे, या आधारे तसेच राज्य सरकारने निर्देशित केल्याप्रमाणे मार्चपासूनची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार नवीन आकडेवारी आली आहे. आकडेवारीत वाढ दिसली तरी हेतूबाबत शंका घेण्याचे कारण असू नये.

फेरतपासणीमध्ये राज्यात पुढीलप्रमाणे आणखी मृत्यूसंख्या आढळली. अहमदनगर १, अकोला १४, अमरावती ६, औरंगाबाद ३३, बुलढाणा २, धुळे १२, जळगाव ३४, जालना ४, लातूर ३, नांदेड २, नाशिक २८, उस्मानाबाद ३, पालघर ११, परभणी १, पुणे ८५, रायगड १४, रत्नागिरी १, सांगली ४, सातारा ६, सिंधुदूर्ग ३, सोलापूर ५१, ठाणे १४६, वाशिम १, यवतमाळ १ अशी एकूण ४६६.

अखेर सत्य पुढे आलेच
कोरोना मृत्यूचा आकडा लपविला जात आहे असा आरोप आपण केला होता. सरकारने आज खरी आकडेवारी दिली; मात्र आतापर्यंत खरी आकडेवारी लपविणाऱ्यांवर काय कारवाई करणार असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही कोरोनामृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारीत दाखविले जात नसल्याबद्दल तक्रार केली होती. आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना बळी कसे नोंदवायचे, याचे स्पष्ट दिशानिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ आॅडिट कमिटीची कशी काय होऊ शकते? ही समिती मृत्यूसंख्या कमी करण्यासाठी आहे की, मृत्यूसंख्या दडपण्यासाठी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

राज्यात ८१ मृत्यू
राज्यात मंगळवारी ८१ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, तर दोन हजार ७०१ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले.
दिवसभरात एक हजार ८०२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले.
राज्यात आजपर्यंत एकूण ५७ हजार ८५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात ५० हजार ४४ रूग्णांवर उपचार सुरू असल्याने आजवरच्या रूग्णांची एकूण संख्या एक लाख १३ हजार ४४५ वर पोहोचली.

Web Title: CoronaVirus Corona death toll suddenly increases by 1328

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.