CoronaVirus News: कोरोना मृत्यूवरून फडणवीसांचे ठाकरे सरकारवर पुन्हा गंभीर आरोप; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 03:06 AM2020-06-19T03:06:17+5:302020-06-19T07:43:54+5:30

हजारपेक्षा अधिक कोरोना मृत्यूंची नोंद शासनाच्या पोर्टलवर झालेली नाही, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लोकमत डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत केला.

CoronaVirus Corona death toll still hidden alleges Devendra Fadnavis | CoronaVirus News: कोरोना मृत्यूवरून फडणवीसांचे ठाकरे सरकारवर पुन्हा गंभीर आरोप; म्हणाले...

CoronaVirus News: कोरोना मृत्यूवरून फडणवीसांचे ठाकरे सरकारवर पुन्हा गंभीर आरोप; म्हणाले...

googlenewsNext

- यदु जोशी

मुंबई : कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची आकडेवारी सरकारकडून लपविली जात असल्याचा आरोप आपण केल्यानंतर एका दिवसात १३५२ इतका मृतांचा आकडा वाढला; पण आजही सरकारकडून ही लपवाछपवी सुरूच आहे. हजारपेक्षा अधिक कोरोना मृत्यूंची नोंद शासनाच्या पोर्टलवर झालेली नाही, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी लोकमत डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत केला.

सरकारच्या पोर्टलवर नोंद नसलेल्या हजाराहून अधिक मृत्यूंव्यतिरिक्त अनेकांचा मृत्यू इस्पितळात नेण्यापूर्वीच झाला, स्वॅब घेतलेला नव्हता. त्यामुळे ते कोरोनाने दगावले याचे पुरावेही राहिलेले नाहीत. आकडेवारी कशी लपवली जात आहे याचा उलगडा आपण लवकरच करू, असे फडणवीस म्हणाले.
कोरोनावरील उपचारासाठी राज्य शासन व महापालिकांनी अंदाधुंद खरेदी केली. १२०० ते दोन हजार रुपये किमतीच्या बॉडी बॅगची खरेदी ६५०० रुपयांत करण्यात आली. पीपीई किटची खरेदी अव्वाच्या सव्वा दराने झाली. हळूहळू खूप गोष्टी बाहेर येतील.

कोरोनाचा मुकाबला करताना सरकारमध्ये समन्वय नाही. अशी लढाई भगवान भरोसे लढता येत नाही. उद्धवजी फेल झाले की पास झाले अशा प्रकारचे सर्टिफिकेट द्यायला मी बसलेलो नाही. ही निर्णय घेण्याची वेळ आहे, टाळण्याची नाही. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी निर्णयक्षम व्हायला हवे. निर्णय स्वत: घ्यावे लागतात. नोकरशाही निर्णय घेते अशी सध्याची चर्चा आहे.

परीक्षांचा घोळ संपवा
विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ हा राज्य सरकारची अनिर्णीत राहण्याची स्थिती आणि अनेक पॉवर सेंटर यामुळे निर्माण झाला. परीक्षांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, राज्यपालांना आहे असे मत राज्याच्या विधी व न्याय विभागाने दिले असल्याची माझी माहिती आहे. भविष्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताचे काय हे सरकारने ठरवायला हवे. अमुकच निर्णय घ्या असे आमचे म्हणणे नाही परंतू एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसह सर्वांबाबत तत्काळ निर्णय घ्या एवढाच आमचा आग्रह आहे.

इतकी लाचारी मी बघितली नाही
मी पहिले असे सरकार पाहिले की विरोधकांनी त्यांचे गोडवे गावेत असे त्यांना वाटते. तसे काम केले तर तेही करू. सरकारचे अपयश दिसत असताना टीका करणारच. सरकार अस्थिर करण्यात रस नाही, ते आपसातील संघर्षातूनच पडेल. शंभर वर्षे जुन्या पक्षाला कुरकुरणारी खाट म्हटल्यानंतर त्या पक्षाचे प्रमुख म्हणतात, आम्ही कुरकुरणारी खाट असू, पण काय म्हणायचेय ते समजून घ्या. इतकी लाचारी मी बघितली नाही. लाचारीचे सरकार फार काळ टिकत नसते.

Web Title: CoronaVirus Corona death toll still hidden alleges Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.