Corona Vaccine: Maharashtra crosses 1 crore mark in vaccination; The highest record in the country | Corona Vaccine: लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा; देशात सर्वाधिक विक्रमी नोंद

Corona Vaccine: लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा; देशात सर्वाधिक विक्रमी नोंद

ठळक मुद्देआतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे

मुंबई – एकीकडे राज्यात लसींचा तुटवडा होत असल्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे रविवारी राज्यात लसीकरणात आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून आज राज्याने त्यात विक्रमी नोंद केली असून आतापर्यंत सुमारे १ कोटीहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.

आतापर्यंत १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होईल असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप  व्यास यांनी सांगितले. याविक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

राज्यात शुक्रवारपर्यंत १० लाख ४२ हजार ६०८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर ५ लाख ४ हजार ३५७ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. ९ लाख ३० हजार ५३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, तर ३ लाख ७ हजार ५१ लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असलेल्या ६७ लाख ३६ हजार ६४० लाभार्थ्यांना पहिला डोस, तर १ लाख १९ हजार ९७ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत मुंबईत १६ लाख ६ हजार ९४४ लाभार्थ्यांना, पुण्यात १३ लाख १० हजार ५६६, ठाण्यात ७ लाख १९ हजार ३९७, नागपूरमध्ये ६ लाख ८२ हजार ११९, नाशिकमध्ये ४ लाख २८ हजार ४४८ लाभार्थ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.

आतापर्यंत २ लाख ५७ हजार ६० आरोग्य कर्मचारी, २ लाख ७६ हजार १९२ फ्रंटलाइन कर्मचारी, ४५ ते ५९ वयोगटातील ४ लाख २६ हजार ६२३ आणि ६० हून अधिक वय असलेल्या ६ लाख ५४ हजार ४०३ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

शिल्लक कोव्हॅक्सिनचे डोस वापरायला अखेर परवानगी

शिल्लक असलेले कोव्हॅक्सिनचे डोस पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला वापरायला राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. शिल्लक असलेले ६७००० डोस यामध्ये वापरता येणार असल्याने पुण्याला मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण थांबवण्याची वेळ आली. राज्यातही अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाला होता.मात्र या गोंधळीचे वेगळेच कारण समोर आले होते. राज्याकडे कोव्हिडशिल्डचा तुटवडा असला तरी प्रत्यक्षात कोव्हॅक्सिन उपलब्ध होते. मात्र राज्य सरकारने या लसी दुसऱ्या डोस साठी राखीव ठेवायचा आदेश दिला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona Vaccine: Maharashtra crosses 1 crore mark in vaccination; The highest record in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.