Corona Vaccination: अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प; मागणी जास्त, पुरवठा अत्यल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 02:50 AM2021-04-10T02:50:13+5:302021-04-10T07:16:49+5:30

राज्यभरात अनेक ठिकाणी अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. गुरुवारीच अनेक ठिकाणी डोस संपल्यामुळे लसीकरण थांबवण्यात आले होते.

Corona Vaccination: Vaccination stopped in many places due to lack of doses | Corona Vaccination: अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प; मागणी जास्त, पुरवठा अत्यल्प

Corona Vaccination: अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प; मागणी जास्त, पुरवठा अत्यल्प

Next

नागपूर/कोल्हापूर/मुंबई : राज्यभरात अनेक ठिकाणी अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी कोरोना लसींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला. गुरुवारीच अनेक ठिकाणी डोस संपल्यामुळे लसीकरण थांबवण्यात आले होते. शुक्रवारी विदर्भात अनेक जिल्ह्यांतील, विशेषत: ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रे ठप्प पडली होती. पश्चिम महाराष्ट्रात पुणे वगळता परिस्थिती अधिक गंभीर असून तेथे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी केंद्रे सुरू होती. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील बरीच केंद्रे बंद असल्याचे चित्र बघायला मिळाले. 

नागपूर जिल्ह्याला पुणे आरोग्य विभागाकडून मिळालेल्या १० हजार डोसच्या भरवशावर गुरुवारपासून बंद असलेली केंद्रे शुक्रवारी दुपारी १२ वाजेनंतर पुन्हा सुरू झाली. शहराला ३ हजार तर ग्रामीणला ७ हजार डोस मिळाले. परंतु शहरात रोज कोव्हॅक्सीनचे जवळपास हजारावर डोस लागत असल्याने पुढील तीन दिवसानंतर काय, असा प्रश्न आहेच. दुसरीकडे कोविशील्डचे केवळ २० हजार डोस उपलब्ध आहेत. साधारण दीड दिवस पुरतील एवढा साठा असल्याने लसीकरण केंद्रावर गर्दी वाढली आहे.

लस साठा संपल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ९० केंद्रे दुपारीच बंद करण्याची वेळ जिल्हा आरोग्य प्रशासनावर आली. लसटंचाई असल्याने एकूण ९८ केंद्रांपैकी ८ केंद्रांवरच शुक्रवारी दिवसभर लसीकरण होऊ शकले.

भंडारा जिल्ह्यातही लसींचा तुटवडा असून केवळ ५०४० डोज शिल्लक होते. त्यामुळे शुक्रवारी १८४ पैकी केवळ १८ केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
शुक्रवारी यवतमाळ जिल्ह्यातील १७८ पैकी फक्त ३९ कोरोना लसीकरण केंद्रे सुरू होती. तेथे सहा हजार लस पाठविल्या गेल्या होत्या. त्यापैकी एक हजार लस शिल्लक असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या एक हजार लसींच्या आधारे शनिवारी दहा लसीकरण केंद्र सुरू ठेवले जाणार आहे.

अकोला जिल्ह्यात शुक्रवारी केवळ ५० केंद्रावर लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून १०३ लसीकरण केंद्र बंद होती.
गोंदिया जिल्ह्यात बुधवारपासून कोरोना लसींचा साठा संपल्याने शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण मोहिम ठप्प होती. जिल्ह्यातील एकूण १४० केंद्रावरुन कोविड लसीकरणाची मोहिम सुरु करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत लसींचा साठा प्राप्त झालेला नव्हता.

पश्चिम महाराष्ट्रात अत्यल्प केंद्रे सुरू
पुण्यात लस साठा नसल्याने ३६ केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. दुपारनंतर थोडा साठा आला. त्यामुळे ९४ केंद्रे सुरू ठेवण्यात आली.
सातारा जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून लसीचा तुटवडा असल्याने सर्व ४४६ लसीकरण केंद्रे शुक्रवारीदेखील बंद ठेवण्यात आली. 
सांगली जिल्ह्यातील २२३ केंद्रे बंद होती तर फक्त ४ केंद्रे सुरू ठेवण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात १९८ केंद्रे बंद होती तर ३८ केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १०४ पैकी १२ केंद्रे सुरू होती.

राज्यात ९३ लाखांवर नागरिकांचे लसीकरण
गुरुवारी दिवसभरात ३ लाख ५४ हजार २७ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ९३ लाख ४५ हजार ५२ जणांना लस  देण्यात आली.

लसीकरण ठप्प
जळगाव जिल्ह्यातील १३३ केंद्रांपैकी शहरातील सहा केंद्रांसह जिल्ह्यातील २३ केंद्रांवर पूर्णत: लसीकरण ठप्प आहे. ७७ आरोग्य केंद्र व महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील काही खासगी रुग्णालयात थोड्याफार प्रमाणात लसीकरण झाले. गेल्या तीन दिवसांपासून जळगाव शहरात तर लसीकरण झालेलेच नसून दुसऱ्या डोसबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. शनिवारी सकाळी लसीचे ३५ हजार डोस आल्यानंतर त्यांचे वाटप होईल.

लांबच लांब रांगा
मुंबईत शुक्रवारी लस संपल्यामुळे ७१ केंद्रांवर लसीकरण बंद करण्यात आले. प्रशासनाकडून दुपारनंतर एकूण ९० केंद्र बंद करण्यात आली. दहिसर चेकनाका परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ज्यांच्याकडे शुक्रवारचे टोकन होते, त्यांनाच लसीकरण केंद्रात घेण्यात आले. त्यामुळे अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या. गोरेगावातील नेस्कोच्या केंद्रावर मोठी झुंबड उडाली होती. सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या लोकांना बाहेर येऊन परत जाण्याची विनंती करताना पोलीस दिसले. ठाणे महापालिकेने दोन दिवसाच्या वीकेंड लॉकडाउनचे कारण देत दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Corona Vaccination: Vaccination stopped in many places due to lack of doses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.