Corona Vaccination: केंद्राकडून लसी मिळताच लहानग्यांचे लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:04 IST2021-10-22T08:04:14+5:302021-10-22T08:04:36+5:30
लहानांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र आग्रही आहे. लसी मिळताच लहानग्यांच्या लसीकरणाची मोहीम तातडीने हाती घेतली जाईल, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

Corona Vaccination: केंद्राकडून लसी मिळताच लहानग्यांचे लसीकरण
मुंबई : राज्याने १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणात आघाडी घेतलेली आहे, तसेच १८ वर्षांखालील व्यक्तींच्या लसीकरणाचीही राज्याची तयारी आहे. मात्र, लहानग्यांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही दिशानिर्देश आलेले नाहीत. आयसीएमआरनेदेखील याबाबतच्या मार्गदर्शक सूचना अद्याप जारी केलेल्या नाहीत. लहानांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्र आग्रही आहे. लसी मिळताच लहानग्यांच्या लसीकरणाची मोहीम तातडीने हाती घेतली जाईल, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी गुरुवारी मंत्रालयात आरोग्य मंत्री राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची बैठक झाली. यानंतर टोपे म्हणाले की, १८ वर्षांवरील महाविद्यालयीन युवांच्या लसीकरणाची गती वाढविण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान राज्यात मिशन युवा स्वास्थ्य कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. तर, २५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मोहिमेसाठी प्रत्येक महाविद्यालयातून विद्यार्थ्यांची माहिती, संख्या मिळविण्याचे काम विभागाने तातडीने हाती घेतले आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत आरोग्य विभागाला आवश्यक माहिती पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.