बदलत्या जीवनशैलीचा परिणाम; स्वयंपाकघरातून तांबा, पितळेची भांडी गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 23:42 IST2020-01-15T23:42:17+5:302020-01-15T23:42:52+5:30
आजही ग्रामीण भागात जुन्या तांब्या-पितळ्याची भांडी क्वचितच पाहायला मिळत आहेत.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम; स्वयंपाकघरातून तांबा, पितळेची भांडी गायब
आगरदांडा : पूर्वी घरोघरी जेवणात तसेच अन्न शिजविण्यासाठी तांब्याची व पितळेची भांडी मोठ्या संख्येने वापरत होती. त्याचा औषधी गुणधर्मही लोकांना ठाऊक होता. मात्र, बदलत्या जीवनशैलीचा परिणाम तांबा व पितळेच्या भांड्यावरही पडल्याने परिणामी प्राचीन काळापासून वापरात असलेली ही भांडी आज अनेक घरांमधून कालबाह्य झाल्याचे दिसुन येत आहे. या पितळेच्या व तांब्याच्या भांड्यांची जागा आता स्टेनलेस स्टीलच्या व फायबरच्या भांड्यांनी घेतली आहे.
आरोग्य सुदृढ राहवे यासाठी पूर्वीच्या काळी पितळ व तांब्याची भांडी वापरली जात असत. मात्र, काळाच्या ओघात ही भांडी दुर्मीळ झाल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. नव्या पिढीकडुन रेडिओ, टीव्ही, जुन्या लाकडी खुर्च्यासह अन्य जुन्या काळातील वस्तूंचा वापर होत नसल्याचे दिसते. यातच पितळ व तांब्याची भांडीही हद्दपार करून आता फायबर व स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर सर्रास सुरू झाला आहे. सध्याच्या काळात केवळ गरजेपुरताच तांब्याच्या भांड्यांचा वापर होत असल्याने पितळ व तांब्याची भांडी आता दुर्मीळ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीणभागासह शहरातूनही तांब्याची भांडी हद्दपार होत असल्याचे दिसून येते. दैनंदिन वापरात स्टील, फायबरच्या भांड्यांवर विषाणू जमल्यास त्याचा नायनाट लवकर होत नाही, ही बाब आरोग्याकरिता धोक्याची ठरते, त्यामुळे तांबा व पितळ भांड्यांची गरज ओळखणे काळाची गरज आहे. जुने ते सोनेच, असे म्हणतात; पण सध्या हेच सोने कवडीमोल दराने विकले जातेय. एकेकाळी स्वयंपाकगृहाचा कणा असलेली तांब्या आणि पितळेची भांडी स्वयंपाकगृहातून नव्हे तर अगदी घरातूनच हद्दपार होत आहेत. तांब्या, पितळेची जागा आता स्टीलने घेतलीय टिकाऊपेक्षा दिखाऊपणाला महत्त्व आल्याने जुनी भांडी मोडीत काढली जातायेत.
आजही ग्रामीण भागात जुन्या तांब्या-पितळ्याची भांडी क्वचितच पाहायला मिळत आहेत. पूर्वी पितळेची समई, निरंजन, ताट, तांब्या तसेच चमचा याचा वापर जास्त करून देवपूजा करण्यासाठीच केला जायचा. मात्र, काळाच्या ओघात ही देवपूजेची भांडी दुर्मीळ होत गेली.
वजनाला हलके आणि स्वस्त असलेल्या स्टील व अल्युमिनियमपासून बनविण्यात आलेली ताट, वाटी, चमचा आदी भांडी लग्न, वास्तुशांती अशा कार्यक्रमांमध्ये आजच्या काळात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.