Contribution of the Dalai Lama, the peacekeeper in the Buddhist universe | बौद्ध विश्वातील शांतीदूत दलाई लामांचे योगदान
बौद्ध विश्वातील शांतीदूत दलाई लामांचे योगदान

- बी.व्ही. जोंधळे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० साली औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात जो सकारात्मक आमूलाग्र बदल घडवून आणला, त्या मिलिंद परिसरात बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक व जगाच्या पातळीवर शांतीदूत म्हणून मान्यता पावलेले पूज्य दलाई लामा व बौद्ध राष्ट्रांच्या प्रमुख बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीत दि. २२ ते २४ नोव्हेंबरच्या दरम्यान जागतिक बौद्ध धम्म परिषद होत आहे ही बाब मराठवाड्याच्या धम्म चळवळीत जशी उल्लेखनीय ठरावी तसेच जागतिक धम्म चळवळीच्या इतिहासातसुद्धा मोलाची ठरावी अशीच आहे.

धम्म चळवळीच्या प्रवासात धम्म परिषदांना सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण स्थान राहत आलेले आहे. म. गौतम बुद्धाच्या निर्वाणानंतर तीन धम्म संगिती (धम्मपरिषदा) झाल्या. राजा बिंबीसार याचा पुत्र अजातशत्रू याने बुद्धाच्या निर्वाणानंतर तीन महिन्यानंतर सप्तप्रर्णी गुंफा राजगृह येथे महाकाश्यप स्थवीर यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली धम्म संगिती (धम्म परिषद) आयोजित केली होती. या परिषदेत बुद्धाच्या सहवासात आलेल्या. भिख्खुनी धम्माची आणि विनयाची सूत्रबद्ध मांडणी केली होती. त्यानंतर तब्बल शंभर वर्षांनी वैशाली येथे शिशूनागराजाचा मुलगा कालाशोक याच्या कार्यकालात दुसरी धम्म संगिती झाली. महास्थवीररावत यांच्या अध्यक्षतेखाली आठ महिने चाललेल्या या परिषदेत विनयाच्या व्याख्येवरून मतभेद होऊन बुद्ध धम्मातील हिनयान व महायान हे पंथ उदयास आले. सम्राट अशोकाच्या काळात स्थवीर मोग्गलीपूत्र यांच्या कार्यकाळात तिसरी धम्म संगिती झाली. आठ महिने चाललेल्या या धम्मपरिषदेत स्थवीर मोग्गलीपूत्र तिस्स यानी ‘कथावत्थु’ हा ग्रंथ साकार केला. इ.स. १०६ मध्ये चौथी धम्मसंगिती श्रीलंकेत झाली. या नंतर जगभर बौद्ध राष्ट्रात धम्म परिषदांचे आयोजन होत आले असून या परिषदातून म. गौतम बुद्धाचा मानवी कल्याणाचा विचार माणसांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न सातत्याने होत आलेला आहे.

औरंगाबादेत होत असलेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे वैशिष्ट्य असे की, बुद्धाची समता, शांती अहिंसेचा मार्ग अंगीकारलेले बौद्ध धर्मगुरू दलाई लामा हे या परिषदेस प्रमूख अतिथी म्हणून उपस्थित रहात आहेत. एका शेतकरी कुटूंबात ६ जुलै १९३५ साली जन्मलेल्या दलाई लामांचे मूळ नाव तेझिंन ग्यास्तो असून त्यांनी १४ वे दलाई लामा म्हणून १७ नोव्हेंबर १९५० रोजी लामा पदाची सुत्रे हाती घेतली. तिबेटमध्ये दलाई लामांची परंपरा १४ व्या शतकापासून सुरू झालेली असून दलाईलामा या शब्दाचा अर्थ ज्ञानाचा महासागर असा आहे. पहिले दलाई लामा जेनडून ट्रप होते. दलाईलामा हे तिबेटी लोकांचे धर्मगुरू जसे असतात तसेच ते तेथील शासन प्रमूख सुद्धा असतात. आज पर्यंत तेरा दलाई लामा होऊन गेले असून विद्यमान दलाई लामा हे चौदावे लामा आहेत.

चीनने १९५० साली तिबेटवर आक्रमण करून व हा भूभाग आपलाच असल्याचे घोषित करून तिबेटीयन जनतेवर अनन्वीत अत्याचार केले. बुद्धाच्या शांतता प्रिय देशात हिंसाचार, लाठीमार, अश्रुधूर, गोळीबारासारख्या अत्याचारांनी टोक गाठले. जनतेच्या सर्व प्रकारच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादले गेले. बौद्ध संस्कृती, कला, परंपरेचा नाश केला. चीनच्या वाढत्या अत्याचारामुळे व सुरक्षिततेच्या कारणास्तव दलाई लामाना त्यांच्या कुटूंबियांसह १९५९ मध्ये तिबेट सोडून भारताच्या आश्रयास यावे लागले. काही लोक नेपाळ, भूतान व इतरत्र आश्रयास गेले. पंडीत जवाहरलाल नेहरू व दलाई लामा यांची १९५९ मध्ये मसूरी येथे भेट झाली होती.

आज जगभर तिबेटीयन लोक निर्वासितांच जीण जगत आहेत. बहुतांश तिबेटीयन भारतात आहेत. दलाई लामाच्या नेतृत्त्वाखाली तिबेटीयन जनता आज तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी झगडत आहे. दलाई लामाना त्यांच्या शांतताविषयक प्रयत्नांची दखल घेऊनच १९८९ मध्ये नोबेल पारितोषक देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. देश-विदेशात धर्म, तत्त्वज्ञान, अहिंसा, जागतिक शांतता मैत्री, करूणा सदभाव या मानवी मूल्यांवर दलाई लामांची व्याख्याने होत असतात. जगातील सर्व धर्मपंडीतांशी चर्चा करतांनाच ते वैज्ञानिकांशीही संवाद साधतात. देश-विदेशातील अनेक विद्यापीठानी त्याना सन्माननीय डॉक्टरेटची पदवी देऊन सन्मानित केले आहे. दलाईलामानी विविध देशांच्या संसदेत भाषणे दिली आहेत. त्यानी आजवर ६२ देशांना भेटी दिल्या असून ७२ च्यावर पुस्तके लिहिली आहेत.

‘फ्रिडम इन एक्साईल’ व ‘माय लँड अँड माय पिपल’ ही त्यांनी लिहिलेली दोन आत्मचरित्रे लोकप्रिये आहेत. कोणतीही व्यक्ति गुलाम नसावी अशी त्यांची धारणा आहे. स्वत:ला सामान्य बौद्ध भिख्खु म्हणविणारे दलाईलामा हे जगात बौद्धमताचा प्रसार करण्यासाठी अविरत झटत असून पर्यावरणाच्या संरक्षणासाठीही ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणारी धम्म परिषद म्हणूनच ऐतिहासिक ठरणारी आहे.

Web Title: Contribution of the Dalai Lama, the peacekeeper in the Buddhist universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.