महापालिकेला ठेकेदारांचा विळखा
By Admin | Updated: April 1, 2015 03:03 IST2015-04-01T03:03:50+5:302015-04-01T03:03:50+5:30
विकासनिधीचे वाटप वॉर्डातील गरजेनुसार नव्हे तर ठेकेदारांच्या मागणीप्रमाणे होत असल्याचा खळबळजनक आरोप मनसेने केला आहे़

महापालिकेला ठेकेदारांचा विळखा
मुंबई: विकासनिधीचे वाटप वॉर्डातील गरजेनुसार नव्हे तर ठेकेदारांच्या मागणीप्रमाणे होत असल्याचा खळबळजनक आरोप मनसेने केला आहे़ यामुळे पालिकेतील आर्थिक व्यवहारांबाबत संशयाचे धुके दाटू लागले आहे़ अशा टक्केवारीकडे एखाद्या नगरसेवकाने बोट दाखविण्याची ही पहिलीच वेळ नाही़ परंतु या प्रकरणामुळे ठेकेदारच पालिका चालवित असल्याचा आरोप आता विरोधी पक्षातून होऊ लागला आहे़ टक्केवारीचे संभाषण जनतेपुढे आल्यानंतर महापालिकेला ठेकेदारांचा विळखा पडल्याचीच चर्चा सध्या रंगते आहे.
नगरसेवकांबरोबर संगनमत करून सिव्हिल वर्क कॉन्ट्रॅक्टर वॉर्डस्तरावरील छोट्या-मोठ्या कामांचे कंत्राट मिळवितात, असा आरोप तीन वर्षांपूर्वी मुख्य लेखापाल यांनी केला होता़ ठेकेदारांची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आयुक्त सीताराम कुंटे यांनी ई-निविदा प्रक्रिया आणली़ परंतु तेथेही ठेकेदारांनी खर्चापेक्षा निम्म्या किमतीच्या निविदा भरून ई-निविदा प्रक्रियेत अडथळे आणले़ काही वॉर्डांमध्ये रात्रीच्या वेळेत लिंक ब्लॉक करून ठरावीक ठेकेदारांनी निविदा भरल्याचे प्रकरण गेल्यावर्षी उजेडात आले़
सुमारे शंभर कोटींच्या या ई-निविदा घोटाळ्याची चौकशी झाली़ २२ अधिकारी आणि ४० ठेकेदारांना याप्रकरणी निलंबितही करण्यात आले़ पालिकेचे कंत्राट ठरावीक ठेकेदारांना मिळण्यासाठी ठेकेदारांचे सिंडिकेटही तयार झाले आहे़ याबाबत अनेक वेळा स्थायी समितीमध्ये चर्चा झाली़ मात्र चौकशीचे आदेश देण्याचे धाडस सत्ताधारी शिवसेना-भाजपाने अद्याप दाखविलेले नाही़ त्यामुळे सत्ताधारीच या टक्केवारीच्या व्यवहाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे़ (प्रतिनिधी)