संप मिटला, रुग्णांचे मात्र झाले हाल
By Admin | Updated: July 4, 2015 03:36 IST2015-07-04T03:36:08+5:302015-07-04T03:36:08+5:30
गुरुवारपासून मार्डच्या डॉक्टरांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरू होता. त्यामुळे काही रुग्णालयांमध्ये शुकशुकाट तर काही ठिकाणी रुग्णांचे हाल झाल्याचे चित्र दिसले.

संप मिटला, रुग्णांचे मात्र झाले हाल
मनीषा म्हात्रे , मुंबई
गुरुवारपासून मार्डच्या डॉक्टरांनी पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरू होता. त्यामुळे काही रुग्णालयांमध्ये शुकशुकाट तर काही ठिकाणी रुग्णांचे हाल झाल्याचे चित्र दिसले. त्याचप्रमाणे रुग्णवाहिकांचाही वेग थंडावलेला होता.
डॉक्टरांच्या आंदोलनामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने ६ महिन्यांच्या मोहम्मद साहेलचा बळी गेल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. मध्यरात्री तीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मात्र केईएम प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले. साहेल ४० टक्के भाजला असल्याने त्याला दाखल केल्यापासूनच त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.अविनाश सुपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सकाळी रुग्णालयांच्या चारही बाजूने पोलिसांचा फौजफाटा पाहावयास मिळाला. एरवी गजबज असलेल्या केईएम रुग्णालयात शुकशुकाट होता. डॉक्टरांच्या आंदोलनाची माहिती असलेल्या अनेकांनी रुग्णांना वेळीच दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र डॉक्टरांच्या आंदोलनाची माहिती नसलेले रुग्ण रुग्णालयाबाहेरील संपाच्या पाटीवरील डॉक्टरांच्या दिलगिरीचा फलक पाहून माघारी फिरले, तर काहींनी रुग्णालय प्रशासनाच्या नावाने संताप व्यक्त केला. या संपाचा सर्वात जास्त फटका मुंबईबाहेरून आलेल्या रुग्णांना बसला. गुरुवारी सुरु झालेले डॉक्टरांचे आंदोलन सलग दुसऱ्या दिवशीही सुरु राहिल्याने मुंबईतील प्रमुख रुग्णालयांचे बाह्यरुग्ण विभाग अर्धवट बंद स्थितीत होते. त्यामुळे नायर, केईएम आणि जेजे या रुग्णालयात आलेल्या रुग्णांचे हाल झाले. याचा सर्वाधिक फटका नायर रुग्णालयातील रुग्णांना बसला. रुग्णवाहिकांनाही रुग्णालयांमध्ये प्रवेश देण्यात आला नव्हता. दरम्यान, चिंताजनक प्रकृती असलेल्या पाच ते सहा रुग्णांवरच नायर रुग्णालयात उपचार झाले.
केईएममध्ये रुग्णांच्या
नातेवाइकांचा आक्रोश
वेळीच उपचार न मिळाल्याने मृत पावलेल्या मोहम्मदच्या कुटुंबीयांनी केईएम रुग्णालयात गोंधळ घातला. मुलावर उपचार करा, अशी विनवणी करूनही केवळ संपामुळे माझ्या मुलाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. चिमुकल्याच्या मृत्यूने साहेल कुटुंबीय पूर्णत: कोलमडून गेले होते.
...अन् पुन्हा माघारी
वसई येथील रहिवासी असलेले ५० वर्षीय
राजेंद्र गुप्ता यांना लठ्ठपणाचा आजार आहे. अचानक श्वासोच्छ्वास घेण्यास त्यांना त्रास जाणवू लागला. पूर्वी केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते.
म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना केईएम रुग्णालय गाठले. रुग्णालयाबाहेर एका स्टे्रचरवर त्यांना ठेवले. बराच वेळ ताटकळत राहिल्यानंतर डॉक्टरांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाल्याचे त्यांची पत्नी रुपाली गुप्ताने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अखेर निराश होऊन पुन्हा रुग्णवाहिकेच्या शोधासाठी त्यांच्या मुलाने शोधमोहीम सुरू केली. बराच वेळाने खाजगी रुग्णवाहिकेची सोय झाली आणि त्यांना पुन्हा माघारी नेण्यात आले.
मार्ड आंदोलनाला
फोर्डाचाही पाठिंबा
मुंबईसह राज्यातील सुमारे चार हजार निवासी डॉक्टरांनी वेतनवाढ, सुरक्षा व्यवस्था, रजा आदी मागण्यांसाठी गुरुवारपासून आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला दिल्लीच्या फोर्डा अर्थात फेडरेशन आॅफ रेसिडेंशल डॉक्टर असोसिएशननेही पाठिंबा दर्शवला होता.